@maharashtracity
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे चौकशीचे आदेश
धुळे: धुळे महानगर पालिकेतील (DMC) दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत गैरव्यवहार व निधीच्या अपव्ययाबाबत राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांची भेट घेऊन तक्रार केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत ना. मुंडे यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत.
या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करणार आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे महानगर पालिका कार्यक्षेत्रात महाराष्ट्र शासनाच्या वतीने दलित वस्ती सुधार योजना (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीत विकास करणे) अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. हा निधी दलित वस्ती मधील रस्ते, गटारी, संरक्षण भिंत, सभागृह, या कामांसाठी वापरण्यात यावा, असे शासनाला अभिप्रेत होते.
परंतू, धुळे महानगर पालिकेने हा निधी दलित वस्तीमध्ये खर्च न करता इतरत्र त्याचा वापर केला आहे. यामुळे शहरातील दलित, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, नवबौध्द या समाजावर अन्याय झाला आहे.
यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ, ग्रामीण अध्यक्ष धनंजय शिरसाठ यांच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेवून या संदर्भात लेखी तक्रार केली.
या तक्रारीची दखल घेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती ही चौकशी करणार आहे.