उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आरोप
By Anant Nalavade
Twitter: @nalavadeanant
मुबई: शिवसेना नेते, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जहरी टीका करीत राऊत यांचा उबाठा-शिवसेना संपवण्याचा कट आहे असा आरोप केला. तसेच आता कर्नाटक निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसची ताकद वाढली असून यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) यांची सेना राज्यात पाचव्या क्रमांकावर तर महाविकास आघाडीत तीन नंबरवर फेकली गेली आहे, अशा शब्दात सामंत यांनी ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
महाविकास आघाडीत असताना आम्ही ठाकरे यांना वारंवार सांगत होतो कि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आघाडी करून संजय राऊत हे शरद पवारांसोबत शिवसेना संपविण्याचा कट करीत आहेत. राऊत हे बाळासाहेबांशी नाही तर पवारांशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे भाजपसोबत युती करावी जी नैसर्गिक युती आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत आघाडी करणे हेच शिवसेनेचे नुकसान होण्यास कारणीभूत आहे, असेही सामंत यांनी यावेळी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांची आज जी बिकट अवस्था झाली आहे त्याला संजय राऊत जबाबदार असून कर्नाटक निवडणूक काँग्रेसने जिंकली ही उबाठासाठी धोक्याची घंटा आहे, याकडेही सामंत यांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले, कर्नाटक निवडणूक काँग्रेसने जिंकल्यामुळे आता महाराष्ट्रात मविआचे नेतृत्व नाना पटोले करणार आहेत का हे देखील जनतेला कळले पाहिजे. हा विजय तिथले काँगेस नेते डी.के.शिवकुमार, सिद्धरामैया यांचा आहे. आता इथल्या काही लोकांना स्वप्न पडायला लागले कि महाराष्ट्रतही महाविकास आघाडीचेच सरकार येणार, असा टोलाही त्यांनी लगावला.
जे काल मविआच्या बैठकीला जमले होते त्यांना एक आठवण करून देतो कि, २०१८ ला राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आली आणि त्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीत सर्व २५ जागा भाजपने जिंकल्या. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार असताना २९ पैकी २८ जागा भाजपने जिंकल्या. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहील असे नेतृत्व समोर आहे अशी शक्यता देशात नाही, असे सांगून मोदींवर, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करणे हा एककलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरु आहे. घटनाबाह्य सरकार असल्याची टीका उबाठा करते तर सरकार बहुमताने आले आहे असे अजित पवार सांगतात. लोकशाहीतील खरं मत पवार मांडतात, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्यात पहिल्या क्रमांकावर भाजप, दोन क्रमांकावर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस, चार क्रमांकावर काँग्रेस आणि पाच वर उबाठा आहे, अशा शब्दांत राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना प्रवक्ते सामंत यांनी उबाठाला त्यांची जागा दाखवली.
सामंत पुढे म्हणाले कि ही आकडेवारी माझी नाही, तर ग्रामपंचायत निवडणूक, कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणुकांमधून स्पष्ट झाले आहे. ते म्हणाले, “हाच आमचा मुद्दा होता. ज्यांच्यासोबत आपण युती केली हेच आपल्या नाशाला कारणीभूत ठरणार आहेत. भाजपसोबत युती करावी अशी आमची मागणी होती जी नैसर्गिक युती होती आणि ते न झाल्याने आम्ही उठाव केला.”
महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीतून फार काही त्यांना साध्य होईल असे वाटत नाही असे सांगतानाच भाजपसोबत असताना ठाकरे यांना जो सन्मान मिळत होता तसा कालच्या मविआच्या बैठकीत मिळाला नाही आणि उद्धव ठाकरे यांना दुय्यम स्थान दिले गेले, हेही सामंत यांनी निदर्शनस आणून दिले.
राऊत महाराष्ट्रला आग लावणार का ?
संजय राऊत यांचे नाव न घेता सामंत म्हणाले कि घटनाबाह्य सरकार म्हणून रोज सकाळी ९.३० चा भोंगा उद्योग सुरु असतो. संजय राऊत आपल्या पत्रकार परिषदेतून रोज आग लावण्याचे काम करतात, हे म्हणतात घटनाबाह्य सरकार आहे, प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बंड करावे, पोलिसांनी बंड करा, हि बाब निषेधार्ह आहेच पण आतंकवादाला निमंत्रण दिल्यासारखे आहे. याचा अर्थ तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दंगली घडवणार आहात. उद्या जर पोलिसांनी बंड केल आणि महाराष्ट्राची कायदा – सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार फक्त संजय राऊत असतील. आज दहशतवादी संघटना याकडे लक्ष लावून असतील. पोलिसांना भडकवण्याचे पाप यांनी केले. देशात असे कारस्थान जो करेल त्यासाठी त्याला कायदा सोडणार नाही. ज्यांनी दंगल केल्या, लोकांमध्ये गैरसमज पसरवून, मोदींचे फोटो टाकून मते मागितली आणि राष्ट्रवादीशी आघाडी केली त्यांनी आम्हाला नैतिकता सांगू नये, असा इशाराही सामंत यांनी दिला.
उबाठा नेते संजय राऊत यांनी राज्यात दोन ठिकाणी उद्भवलेल्या जातीय तणावावरून राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवर उत्तर देताना सामंत म्हणाले, “ज्यांचा निवडणुकीचा, लोकशाहीचा अभ्यास नाही, ज्यांनी कधी निवडणूक मैदानात उतरून लढवली नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. तर अजित पवार यांचा अभ्यास आहे, त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून जी मागणी केली तीच आमची मागणी आहे कि काही विडिओ व्हायरल करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोण करतेय याचा शोध घ्यावा आणि चौकशी करावी,” अशी मागणीही सामंत यांनी केली.
राज्य सरकारने कोणतीही निवडणूक थांबवली नाही. मात्र सुप्रीम कोर्टात काही विषय प्रलंबित असल्याने निवडणूका निकाल लागल्यानंतर होतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.