सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

Twitter : @maharashtracity

मुंबई: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मनोरंजन क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दरवर्षी राज कपूर जीवनगौरव पुरस्कार तसेच व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.  या पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केली आहे.

यापूर्वी राज कपूर जीवनगौरव (Raj Kapoor Jeevan Gaurav Puraskar) आणि व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे (V Shantaram Jeevan Gaurav Puraskar) स्वरुप 5 लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे होते. आता यापुढे या पुरस्काराचे स्वरुप 10 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असेल. याशिवाय राज कपूर आणि व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप यापूर्वी 3 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे होते,आता या पुरस्काराचे स्वरुप 6 लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एका आयोजित कार्यक्रमात लवकरच 2020, 2021 आणि 2022 असे तीन वर्षांचे पुरस्कार वितरीत केले जातील, अशी माहितीही  मुनगंटीवार यांनी दिली.

राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार व विशेष योगदान पुरस्कार निवड समितीची बैठक नुकतीच ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांच्यासह दोन्ही पुरस्कार निवड समितीचे सदस्य दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, दिग्दर्शक मधुर भांडारकर, राजदत्त, चंद्रप्रकाश द्विवेदी, नीना कुलकर्णी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here