By Anant Nalawade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: माहिम कापडबाजार, ढाणागल्ली येथील अंगणवाडीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणमध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अथवा कंटेनर अंगणवाडी उपलब्ध करून देण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी गुरुवारी येथे दिले.  

दादर येथील मुंबई महापालिकेच्या जी उत्तर वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात बोलताना लोढा म्हणाले की, २००७ पासून माहिम येथील कापडबाजार, ढाणागल्ली येथे असलेल्या अंगणवाडीसाठी (Anganwadi) जागेची खूप कालावधीपासूनची मागणी आहे. ती लक्षात घेता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. जी उत्तर वॉर्ड येथे २१९२ तक्रारीपैकी आज दाखल झाल्या असून जागीच १६० तक्रारींचे निराकरणही लोढा यांनी केले.        

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जी उत्तर वॉर्ड येथे बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते. महिला व बचत गटांची नोंदणी प्रक्रिया याचीही माहिती महिलांना देण्यात आली.       

भायखळा ई वॉर्ड येथे गुरूवार २८ एप्रिलला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही  करता येणार आहे. हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी तीन ते ५.३० या वेळेत सूरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9  या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.

यावेळी मुंबई महानगपालिकेचे परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, मुंबई उपनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक यासह अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी  यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here