@maharashtracity
मुंबई: मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठण या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) आता महाआरतीची तयारी सुरू केली आहे.
येत्या 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी मुंबईतील तीन मंदिरात सायंकाळी आरतीच्या वेळी मनसैनिकांनी मंदिरात शिरून टाळ मृदुंग घेऊन महा आरती करावी, किमान 100 मनसैनिकांनी या महाआरतीला उपस्थित राहावे, असे आदेश मनसे (MNS) पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीसांनी अडवले, परवानगी नाकारली तरीही मंदिरात शिरा आणि आरती करा, असे स्पष्ट आदेशच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिले आहेत. बांद्राच्या परिसरातील तीन प्रसिद्ध मंदिरात ही महाआरती केली जाणार आहे.
दरम्यान, मशिदीवरील भोंगे (Loudspeaker on Masjid) काढून घ्या अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) हे सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहेत. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही बोलावून त्यांचे मत जाणून घेणार असल्याचे समजते. बैठकीची वेळ आणि दिवस अजून निश्चित झाला नसल्याचे समजते.