Twitter :@maharashtracity
मुंबई
समाजकल्याण विभागात बदलीसाठी चाळीस -चाळीस लाख रुपये घेतले जातात, अशी एका पुण्यातील उपायुक्त दर्जाच्या महिला अधिकाऱ्याची तक्रार असलेल्या संभाषणाचा पेनड्राईव सादर करुन विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत खळबळ उडवून दिली. विभागातील एक अधिकारी आश्रमशाळांतील अल्पवयीन मुलींचे शोषण करतो, असेही तक्रारीत नमूद असल्याची माहिती देतानाच चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. दूध का दूध पानीका पानी, होऊन जाऊ द्या, असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले. आपल्याकडे असे अनेक पेन ड्राईव्ह आहेत, एक- एक बाहेर काढू, असा टोलाही त्यांनी लगावला.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते. आपल्या घणाघाती भाषणात त्यांनी वीजदरवाढ, कोळशाची अवैध लूट, बालभारती पुस्तकांची निकृष्ट छपाई, शिक्षण विभागातील अठरा हजार रिक्त जागांसह शासनाच्या विविध विभागांतील ४६ हजार रिक्त पदे, जातीभेदाच्या त्रासातून १२२ विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, मान्यता मिळालेली व न सुरू झालेली ७२ वसतिगृहे, अनुसूचित जाती जमाती व ओबीसीना मूळ प्रवाहात आणणे, शासनाच्या पाच विभागांत पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार, यासह कामगार विभागातील
गैरव्यवहार आणि सामाजिक न्याय विभागातील अनियमिततेवर वडेट्टीवार यांनी प्रहार केले. ओबीसींची मते घेऊन निवडणून आलात, मग जातनिहाय जनगणना कधी करणार? असा सवाल त्यांनी केला.
वेदांत-फॉक्सकॉन प्रकरण
राज्यात येणार असलेला एक लाख कोटी गुंतवणूक आणि पन्नास हजार रोजगार उपलब्ध करणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प अन्यत्र जाण्यास हे सरकारच जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. श्वेतपत्रिकेतूनच ते स्पष्ट दिसते असेही ते म्हणाले. राज्यातील जनता माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.