विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा हल्लाबोल
@maharashtracity
मुंबई: १९९३ साली दंगल झाली तेव्हा मुंबई शिवसेनेने वाचवली, बाबरी मशीद पडली त्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी उचलली होती. त्यामुळे शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेनेविषयी बोलण्याचे व ती फोडण्याचे पाप ज्यांनी दिल्लीकरांच्या नादाला लागून केलं, त्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी शिवसेनेला हिंदुत्व (Hindutva of Shiv Sena) शिकवू नये, असा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (LoP Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्र्यांनी पैठण येथील सभेत केलेल्या टीकेवर केला.
शिवसेनेच्या हिंदुत्वावर शिंतोडे उडवण्याचे पाप तुम्ही करताय आणि आज जाहीर सभेत ते कबूल केलं. ज्या पद्धतीने दिल्लीकरांपुढे झुकून महाराष्ट्राचा अपमान करत आहात, ज्या दिल्लीकरांनी शिवसेना तोडली ते जर तुमचे आदर्श होत असतील तर ते तुम्हाला लखलाभ होवो, असा घणाघात दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेवर केला.
मराठवाड्यात येऊन मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा (Marathwada Mukti Sangram) इतिहास विसरले, विकासाबाबत एक शब्दही काढला नाही, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मराठवाड्याच्या विकासाला छेद देण्याच काम करत असल्याची टीका दानवे यांनी केली.
सामनाने भल्याभल्यांची वाट लावली
सामना वर्तमानपत्रातील अग्रलेख व बातमी यांची देशपातळीवर दखल घेतली जाते. सामनामध्ये आलेल्या बातमीने भल्याभल्यांची वाट लावली.
त्यामुळे सामना या शिवसेनेच्या मुखपत्रावर टीका करताना सांभाळून बोलण्याचा इशारा दानवे यांनी दिला.
उपमा गव्हाण योजनेची चौकशीची मागणी
पैठण येथील सभेत मंत्री संदीपान भुमरे यांनी घोषणा केलेल्या योजना या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंजुर झाल्या होत्या. आता उपमा गव्हाण योजना घोषित केली ती संकल्पना अप्पा निर्मळ यांची होती. एकप्रकारे भुमरे हे टाळूवरच लोणी खाण्याचं काम करत आहेत. हे कंत्राट त्यांच्या जावई यांना मिळाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी करत याची चौकशी करण्याची मागणी केली.