अजित पवार यांनी सरकारला खडसावले
By अनंत नलावडे
Twitter: @nalavadeanant
मुंबई: चुकीचे काही घडले असेल तर कारवाई केलीच पाहिजे. परंतु सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांना उगीचच त्रास देण्याचा आणि गोवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते कुणीही सहन करणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाल्यांनतर त्याला त्रासून आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका आव्हाड यांनी घेतली होती. अशा पद्धतीने राजकीय विरोधक आहे म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला खडसावले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांवर चर्चा करून सरकारच्या विरोधातील रणनीतीची दिशा ठरविण्यात आली. आम्ही मूग गिळून बसलेलो नाही, अन्यायाला वाचा फोडत राहू, असाही इशारा पवार यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिला.
पवार यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा संदर्भ दिला. आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले होते. त्याला त्रासून राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. वास्तविक चुका असतील मग माझ्या किंवा कुणाच्याही असोत त्याच्यावर कारवाई करावी. परंतु, मुद्दाम कुभांड रचून कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, कुणालातरी पुढे करुन गुन्हा दाखल करायला लावणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही, असे पवार यांनी निदर्शनास आणून दिले.
ते म्हणाले, आम्ही तर १९९९ ते २०१४ आणि २०१९ ते २०२२ असे साडेसतरा वर्ष सत्तेत काम केले. आमच्या काळात विरोधक होते, पण आम्ही असा त्रास देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे असा प्रयत्न कुणी केला तर आम्ही हे सहन करणार नाही, असा निर्वाणीचा इशारा पवार यांनी दिला.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होईल, अशी चर्चा आहे. याबद्दल विचारले असता, बलात्कार न करता गुन्हा दाखल करु शकता का? ही मोगलाईच लागलीय का? असे संतप्त सवालही पवार यांनी केले.
असे व्हायला लागले तर यावरून महाराष्ट्रात उठाव होईल, महाराष्ट्र शांत किंवा गप्प बसणार नाही. लोकांनाही कळते आहे की, कशा पद्धतीने गोवण्यात येत आहे आणि इतक्या खालच्या पातळीवर राज्यातील राजकारण जाणार असेल आणि सरकारी यंत्रणांचा वापर होणार असेल तर आम्हालाही वेगवेगळ्या आयुधांचा वापर करता येईल, असेही त्यांनी बजावले.
विधिमंडळ अधिवेशनात मी भर सभागृहात मुख्यमंत्र्यांना सांगितले की, तुमच्यासमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांची घटना घडूनही तुम्ही स्पष्ट भूमिका घेत नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी समर्पक उत्तर दिले नाही. याचा अर्थ कुठे तरी पाणी मुरते आहे, अशी शंकाही पवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जात आहे. पुरोगामी विचार घेऊन पवार साहेबांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली. आमच्या पक्षात सर्व धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. घटना, कायदा, संविधानाला धरून देश आणि राज्य चालले पाहिजे, या मताची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे जो काही बाऊ करतात त्याला काडीचा आधार नाही. सत्ताधारी पक्षाच्या पोटात दुखत असेल म्हणून ते आमच्याबद्दल अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. तरीही आम्ही आमच्या भूमिकेनेच पुढे जाणार, असेही पवार यांनी यावेळी नमूद केले.
या बैठकीला छगन भुजबळ, दिलीप वळसे- पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी आदी उपस्थित होते.