विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा संतप्त सवाल

Twitter : @maharashtracity

By अनंत नलावडे

मुंबई: तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा- तसा वाटला का? असा रोखठोक आणि संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (LoP Ajit Pawar) यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष खासदार  शरद पवार (NCP President Shara Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली.  या बैठकीसाठी आले असता पवार यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. 

सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. त्यावर बोलताना अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना (Karnataka CM Basavaraj Bommai) खडे बोल  सुनावले. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्य करणे ताबडतोब थांबवावे. त्यांचे हे वक्तव्य निंदनीय असल्याचे नमूद करून  पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला. 

पवार पुढे म्हणाले, लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे काय माहित. आता खरेतर राज्याचे  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे.  असा उपरोधिक टोलाही पवार यांनी यावेळी लगावला. 

केंद्राने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र (Maharashtra) अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही असा इशारा देतानाच, प्रत्येक राज्याचा अस्मितेचा प्रश्न असतो, अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंघ ठेवण्याचं काम केले आहे. आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे, असेही परखड बोल त्यांनी राज्य सरकारला सुनावले.

पवार म्हणाले, आम्ही शिर्डी (Shirdi) येथे गेलो. पंढरपूर (Pandharpur) येथे गेलो तर दर्शन घेतो. आपली ती परंपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो. मात्र ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे? २१ व्या शतकात जग कुठे चालले आहे. बदल होत असताना सायन्स काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात… काय बोलावं? आम्ही हतबल झालो ऐकून, अशा  शब्दात पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here