विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे आवाहन
By अनंत नलावडे
Twitter : @NalavadeAnant
मुंबई: सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम थांबायला तयार नाही. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून हा मोर्चा राजकीय पक्षाशी निगडित नसल्याने या महामोर्चाला राज्यातील सर्व जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केले.
आज महामोर्चाच्या आढाव्यासाठी महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेत्यांची बैठक विरोधी पक्षनेते पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरी येथे पार पडली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती पत्रकारांना दिली. महापुरुषांचा सतत केला जाणारा अपमान, सीमा प्रश्न (border dispute) व महागाई, बेरोजगारी हे सर्व प्रश्न घेऊन सत्ताधारी लोकांचा धिक्कार करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि जनताही मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही, परंतु स्वाभिमान दुखावला गेला आहे, असेही लोक सहभागी होतील, असा दावाही पवार यांनी यावेळी बोलताना केला.
अत्यंत समंजस भूमिका सर्व पक्षांनी घेतली आहे. अनेक राजकीय पक्ष त्यात सहभागी झाले आहेत. ज्या – ज्या वेळी बैठका घेण्यात आल्या, त्या – त्या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. आजच्या बैठकीत मोर्चाचा (Maha Morcha) आढावा घेण्यात आला. तिथे शिस्त राहिली पाहिजे. तिथे कुठेही काहीही विध्वंसक होणार नाही. अतिशय शांततेच्या मार्गाने लोकशाहीत आपले मत प्रदर्शित करताना मोर्चा काढतो त्याच पध्दतीने हा मोर्चा काढणार आहोत, असेही पवार यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘हीच वेळ आहे जागे होण्याची आणि या महामोर्चात सहभागी होण्याची’ अशी हाक तमाम महाराष्ट्र प्रेमींना दिली. शिवाय सीमावादावर जी बैठक झाली त्या बैठकीत नवीन काय घडले असा सवाल करतानाच हा वाद ट्वीटने १५ – २० दिवस चिघळत असताना खुलासा करायला इतका वेळ का लागला आणि हा खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता? असा रोखठोक प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या बैठकीला कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप, कॉंग्रेसचे नेते नसीम खान, शिवसेना आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना आमदार सचिन अहिर, माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रईस शेख, माकपचे प्रकाश रेड्डी, सीपीआयचे मिलिंद रानडे, शेकापचे राजू कोरडे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, माजी आमदार विद्याताई चव्हाण आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.