@maharashtracity
नंदुरबार: राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारचं वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’ असंच करावे लागेल अशी अहिराणी भाषेत (Ahirani language) टीका भाजप नेते आमदार अँड आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी आज येथे केली.
आमदार अँड आशिष शेलार आजपासून तीन दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) दौऱ्यावर असून नंदुरबार (Nandurbar) जिल्हा दौऱ्यात संघटनात्मक आढावा घेऊन त्यांनी आज त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला.
यावेळी ते म्हणाले, आज नंदुरबारमधील जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. एक अभद्र युतीतून कंत्राटावरचे कट कमिशनसाठी एकत्र आलेले हे तीन पक्षांचे ठाकरे सरकार (Thackeray Sarkar) आहे, जे गेल्या दोन वर्षात मंत्रालयात ही पोहचू शकले नाही. जे अजून मंत्रालयातच नाही पोहोचले ते नंदुरबार सारख्या अती दुर्गम भागात कधी व कसे पोहचणार? राज्याचं सरकार नाही पण नंदुरबारपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सरकार मात्र पोहचलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजना सुरु असलेला हा जिल्हा आहे.
नंदुरबारमध्ये यावेळी पाऊस पुरेसा झालेला नाही. दुष्काळसदृश्य परिस्थिती दिसत आहे. २० जुलैपर्यंत ३ लाख ५ हजार हेक्टर पैकी १ लाख हेक्टरपर्यंत पेरणी झाली तर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. पिक कर्ज देण्यात बँकांनी आखडता हात घेतला आहे. २० हजारपेक्षा जास्त खातेधारकांनी कर्ज घेतलेले नाही अशी अवस्था आहे. जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे नियोजन हे सरकार कधी करणार? असा सवाल ही त्यांनी केला.
शेतीच्या, पाण्याच्या अडचणी असताना ठाकरे सरकार नंदुबारमधे नाहीच, पालकमंत्रीही गायब आहेत. आदिवासींसाठी असलेल्या खावटी किटचे ते मिशन घेऊन आलेत पण त्याची गुणवत्ता पाहिली तर प्रत्यक्षात खावटी किटचं “कट कमिशन” घेणे सुरु असल्याचा आरोप त्यांनी पालकमंत्र्यांवर केला आहे. याबाबत भाजप आक्रमक पावले उचलेल असे ही ते म्हणाले.
रोज काहीतरी बोललच पाहिजे असा अट्टहास म्हणजे नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राज्यपालांबाबत केलेल्या विधांनाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, रोज काहीतरी बोललेच पाहिजे असा अट्टहास असलेले नेते म्हणजे नवाब मलिक असे सांगत राज्य सरकार पुरग्रस्त भागापर्यंत पोहोचले नाही. पण राज्यपाल पोहोचले याची खरे तर सरकारला शरम वाटली पाहिजे. पण राज्यपालांवर टीका करुन वातावरण निर्मिती करण्यापलीकडे काही करत नाहीत. नवाब मलिक यांच्या सरकारचा पराभव आहे, म्हणूनच जनतेला राज्यपालांकडे दाद मागावी लागते, असे ही ते म्हणाले.
घोषित होते पण पोहोचत नाही असे ठाकरे सरकारचे पँकेज
पुरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पँकेजबाबत विचारले असता आशिष शेलार म्हणाले, मी पँकेज देणारा नाही तर मदत करणारा असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण त्यांनी शब्द पाळला का? याआधी तौक्ते आणि निसर्ग वादळावेळी घोषित केलेल पँकेज अजून जनतेला पोहोचलेच नाही. तातडीची १० हजाराची मदत मिळालेली नाही अशी अवस्था आहे. घोषित होते पण पोहोचत नाही असे ठाकरे सरकारचे पँकेज असते. या संकटाची व्याप्ती ही अजून सरकारच्या लक्षात आलेली नाही. जनतेला मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे.
सरकारचे निर्बंध म्हणजे खाली डोक वर पाय
दोन लसी घेतलेल्यांना सुट द्या असे न्यायालय सांगत आहे. पण काय नियम लावतात त्याला निर्बंध नाही. देउळ बंद पण पब, बार सुरु अशी अवस्था आहे. प्रत्येक जण वेगवेगळी विधान करतात. सरकारच्या तीन पक्षांत बेदीली असल्याने एकवाक्यता नाही. सरकार जनतेबाबत बेफिकिर आहे. अस ते म्हणाले
विमानतळावर शिवसेनेचं टक्केवारीच आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाला धक्का लावल्यास भाजप विरोध करेलच. मात्र हस्तांतरणाचा ठराव कँबिनेटमध्ये कोणी मंजूर केला? ठाकरे सरकारनेच ना? मग बाहेर आंदोलन कशाला ? ठरावाच्या वेळी नाव, अटी शर्ती याची काळजी का घेतली नाही ? विरोध पण आपणच करायचा आणि समर्थन ही द्यायचं अशी शिवसेनेची टक्केवारीसाठी चाललेली आंदोलन आहेत, अशा शब्दांत त्यांनी आंदोलनावर टीका केली.