आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचे शक्तीस्थळावर साकडे

@maharashtracity

मुंबई: ठाण्यातील सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. सध्या ते या आमदारांसह गुवाहती येथे आहेत. बंड पुकारलेल्या ठाण्यातूनच सेनेच्या एकसंघतेसाठी साकडे घातले जात आहे.

शिंदेच्या बंडामुळे सेना (Shiv Sena) दोन गटात विभागली जाणार असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, या दुभंगणाऱ्या सेनेला एकत्र राहण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) हे आनंद दिघे यांच्या शक्तीस्थाळावर साकडे घालत आहेत. दिघे साहेबांनी सामान्य शिवसैनिकाला बळ द्यावे, अशी प्रार्थना करत दिघे या संकटकाळातून शिवसेनेला नक्की बाहेर काढतील. जे वादळ आले ते शमेल असे साकडे केदार दिघे यांनी यावेळी घातले आहे.

यावर बोलताना केदार दिघे म्हणाले की, आज ज्या परिस्थितीतून शिवसेना जात आहे, ते पाहता सामान्य शिवसैनिकाला प्रचंड यातना होत आहेत. शिवसेना एकसंध राहिली पाहिजे, दिघे साहेबांना देखील असे प्रकार अपेक्षित नाहीत. सामान्य शिवसैनिक आजही शिवसेना पक्षाशी प्रामाणिक आहे.

निष्ठावंत शिवसैनिक कधीही पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जात नाही. पक्षाचे हित कशात आहे हे नेतृत्वाला माहित असते. त्यामुळे पक्षाने कोणती भूमिका पक्ष हितासाठी घ्यायला हवी हे पक्ष नेतृत्व त्या त्या वेळी ठरवत असते, असा टोला ही केदार यांनी यावेळी लागवला. शिवसेनेत जी स्थिती निर्माण झाली आहे, ती दुर्दैवी आहे असे केदार दिघे म्हणाले.

या कठीण काळात शिवसेनेतील वातावरण पुन्हा पूर्ववत व्हावे व एक कुटुंब असणारी शिवसेना पुन्हा मूळ स्वरूपात ताकदीने उभी रहावी, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सेनेची वाटचाल यापुढेही सुरू रहावी, यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळी शक्ती स्थळ येथे जाऊन केदार दिघे यांनी प्रार्थना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here