@maharashtracity
हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही तर हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही
नवी दिल्ली: पंतप्रधानजी आपसे नाराज नही… हैरान हूँ मैं… माझ्या महाराष्ट्राबद्दल तुम्ही असं कसं बोललात… आमच्यावर का टिका केली… का विरोधात बोललात… का राज्याराज्यात द्वेष पसरवत आहात असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी पंतप्रधानांना आज केला.
आज दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पंतप्रधानांच्या (PM Narendra Modi) वक्तव्याने मनस्वी दु:ख झाल्याचे सांगितले.
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही. हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही तर हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राज्यातील भाजप आमदार, खासदारांनी याविरोधात उभं राहिले पाहिजे, असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ठणकावून सांगितले.
लोकशाहीत टिका करण्याचा सर्वांना अधिकार आहे. तो लोकशाहीने आपल्याला दिला आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा होती की राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना देशाला दिशा देणारे विचार मांडतील. परंतु, त्यांनी जे वक्तव्य केले त्याने राज्याचा अपमान झाला आहे. पंतप्रधान म्हणून निवडून आल्यावर ते देशाचे पंतप्रधान असतात ते कुठल्या पक्षाचे नसतात याचा विसर त्यांना पडलेला दिसतो असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याने आम्हा सर्वांना वेदना झाल्या आहेत. आम्ही मराठी (Marathi) आहोत आणि मला मराठी असण्याचा सार्थ अभिमान आहे. का एखाद्या राज्याबद्दल बोलावे? ‘सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्ता हमारा’ असे आपण म्हणतो तेव्हा या सगळ्या राज्यांमधूनच किती सुंदर भाषा, संस्कार, इतिहास व कल्चरल हेरीटेज देशात आहे हे विसरून कसे चालेल … इतकी विविधता देशात आहे याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी करुन दिली आहे.
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील ट्वीटर संवाद व रेल्वे सोडण्याबाबत मानलेले आभार याची कागदोपत्री माहिती पत्रकारांसमोर मांडली. अनेक खासदारांनी महाराष्ट्राने केलेल्या मदतीबद्दल जाहीर व संसदेत आभारही मानले आहेत, हेही यावेळी सांगितले.
रेल्वे सोडण्याचा निर्णय हा केंद्रसरकारचा होता. तो महाराष्ट्राचा नव्हता. महाराष्ट्राने बस, खाजगी गाड्या दिल्या. रेल्वे महाराष्ट्र सरकार नाही तर केंद्रसरकार चालवते तरी पंतप्रधान असं वक्तव्य करतात हे दुर्दैवी आहे, असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
पंतप्रधानांनी राज्यांना दिशा द्यावी. राज्ये अडचणीत आहेत. कोरोनाची (corona) तिसरी लाट ओसरत आहे. चीनने (China) नवा प्रश्न निर्माण केला आहे. नोकर्यांचा प्रश्न यावर काही बोलतील या अपेक्षेने देश बघत होता. दुर्दैव की आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलले हे वैयक्तिक मला दु:ख देणारी गोष्ट आहे.
असं का महाराष्ट्राबद्दल बोलता आपण… ज्या राज्यांनी फुल ना फुलाची पाकळी १८ खासदार निवडून दिले. तुम्ही पंतप्रधान आहात त्यात सिंहाचा वाटा महाराष्ट्रातील मतदारांचा आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा व महाराष्ट्राचा अपमान ‘कोरोना पसरवणारा महाराष्ट्र’ म्हणून केला, हे धक्कादायक व दुर्दैवी असल्याचेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले.
भाजपचे पंतप्रधान नाही तर तुमचे माझे व देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान हे पद पक्षाचे नाही ते संविधानाने दिलेले पद आहे याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी करुन दिली.
राजकारणाची पातळी इतकी घसरलीय की आपण माणुसकीही विसरणार आहोत. कोण कुणामुळे कोरोना स्प्रेडर होते, याचे आत्मपरीक्षण करावे हे नवाब मलिक (Nawab Malik) बोलले ते बरोबर होते असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.