कोमसाप महाड तालुकाध्यक्षपदी गंगाधर साळवी
स्थानिक आदिवासी तरुणांनी केलेली विनंती केली मान्य
@maharashtracity
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal) यांच्या संकल्पनेतून गडचिरोली महोत्सवाचे (Gadchiroli Festival) आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक आदिवासीच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आज पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांच्यासमोर स्थानिक आदिवासी तरुणांनी (Tribal youth) पारंपरिक रेला नृत्य सादर केलं. यावेळी नृत्य सादर करणाऱ्या तरुणांनी शिंदे यानांही पारंपरिक आदिवासी टोपी परिधान करण्याची विनंती करीत या नृत्यात सहभागी होण्याचा प्रेमळ आग्रह केला. त्यामुळे त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत त्यांनी या नृत्यात सहभाग घेतला.
यानंतर बोलताना त्यांनी ‘गेली अडीच वर्षे या मातीतील लोकांसाठी काम केल्यामुळे त्यांच्याशी एक भावनिक नाळ जुळलेली आहे, आणि त्यामुळेच त्यांनी मोठ्या प्रेमाने केलेला हा आग्रह मोडता आला नाही. त्यामुळेच त्यांच्यासोबत या नृत्यात सहभागी झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सुरू केलेल्या दादलोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून शासकीय योजना स्थानिक आदिवासी बांधवापर्यत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. याशिवाय त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कृषी प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, नृत्य स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा यांचे आयोजन या महोत्सवाद्वारे या भागात प्रथमच करण्यात आले आहे.
याच महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सुरज पुंगाटी या आदिवासी तरुणाची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज आणि विजय ओकसा या आदिवासी तरुणाची जिल्हा शासकीय महाविद्यालय, मुंबईमध्ये निवड झाल्याबद्दल पालकमंत्री शिंदे यांच्याकडून 1 लाख रुपयांची विशेष आर्थिक मदतही करण्यात आली.
यावेळी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा, गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी आणि या महोत्सवात सहभागी झालेले आदिवासी बांधव उपस्थित होते.