‘त्या’ ६० लाख रोजगारांची यादी जाहीर करा!
मुंबई: राज्यात पाच वर्षात ६० लाख रोजगार निर्मिती केल्याचा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा दावा धादांत खोटा, हास्यास्पद तसेच बेरोजगार तरुणांची फसवणूक करणारा आहे. ६० लाख रोजगार कोणत्या-कोणत्या जिल्ह्यात दिले आणि कोणत्या कंपनीत याची नावासह यादी जाहीर करा, असे थेट आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या दाव्याचा समाचार घेताना वडेट्टीवार पुढे म्हणाले की, भाजप-शिवसेना सरकार नियोजनशून्य, दिशाहिन धोरणांमुळेच पाच वर्षांत गुंतवणूक व रोजगार निर्मितीमध्ये सपशेल अपयशी ठरले असून विधानसभा निवडणुकीत तरुणवर्गाच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून ही फसवी व दिशाभूल करणारी आकडेवारी देण्याचा आटापीटा करत आहे. मतांच्या लाचारीसाठी तरुणवर्गाच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे. प्रत्यक्षात नोकरी मिळत नाही म्हणून गावा-गावात बेरोजगारांच्या फौजा असल्याचे चित्र आहे. औरंगाबाद, नाशिक, पुणे या औद्योगिक भागातील नामांकित वाहन उद्योगातूनउत्पादन बंद करुन कामगार कपात केली आहे. या कंपन्यांशी निगडीत असलेले शेकडो छोटे उद्योगही बंद करावे लागले असल्याने लाखो कामगार बेरोजगार झाले आहेत. मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र संकल्पना अपयशी ठरल्या असून लाखो रोजगार देण्याचे सरकारी दावे हवेतच विरले आहेत. मग हे रोजगार दिले तर कुठे, सगळीकडे कामगार कपात होत असताना उद्योगमंत्री कशाच्या आधारावर ६० लाख रोजगार निर्मितीचा दावा करत आहेत?
राज्य सरकारच्या ३२ हजार जागांसाठी तब्बल ३२ लाख इच्छुकांनी अर्ज केले होते तर मागच्या वर्षी मंत्रालयातील कँटीनमध्ये वेटरच्या १३ जागांसाठी ७ हजार अर्ज आले होते. या घटना रोजगार निर्मितीची राज्यातील दुर्दशा दाखवते. राज्यात सध्या ४५ लाख बेरोजगार असल्याचे सरकारी आकडेवारीच सांगते आहे. ही संख्या नोंदणी केलेली आहे, प्रत्यक्षात बेरोजगारांचा आकडा याहून कैकपटीने मोठा आहे. दुसरीकडे नोकरी नसल्याने पदवीधर, उच्चशिक्षित तरुणही चतुर्थश्रेणी पदाकरता अर्ज करत आहेत. पाच वर्ष शिक्षक भरती रखडवली. अशी भीषण स्थिती असताना उद्योगमंत्र्यांनी ६० लाख रोजगार निर्मिती झाल्याचा दावा करणे म्हणजे राज्यातील बेरोजगारी संपली असेच म्हणावे लागेल, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
नोटाबंदी,जीएसटीमुळे आर्थिक क्षेत्रात प्रचंड मगरळ आलेली आहे. त्याचा परिणाम राज्यातील उद्योग क्षेत्रावर झालेला स्पष्ट दिसत आहे. वाहन उद्योग, वस्त्रोद्योग क्षेत्रातील कामगार कपातीनंतर बिस्किट बनवणाऱ्या पारले जी कंपनीलाही १० हजार कामगारांची कपात करावी लागली आहे. आयटी क्षेत्रातही कर्मचारी कपात केली जात आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांची स्थिती तर यापेक्षा भीषण आहे, असे असताना ६० लाख रोजगार निर्मिती केली असा धादांत खोटा दावा करुन नोकरीची आशा लावून बसलेल्या राज्यातील तरुणवर्गाच्या जखमेवर देसाई यांनी मीठ चोळले आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.