#राज्यपाल कोश्यारी पुन्हा अडचणीत?
By अनंत नलावडे
Twitter: @NalavadeAnant
मुंबई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बेताल वक्तव्यांमुळे राज्यात क्षोभ असून प्रमुख विरोधी पक्षांनी राज्यपालांच्या वर्तनावर आक्षेप घेत मुंबईत निषेध मोर्चाचे आयोजनही केले आहे. त्यात पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी अडचणीत आले आहेत. मायरा मिश्रा (Model Maera Mishra’s photoshoot in Raj Bhavan) या मॉडेलने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची बुधवारी थेट भेट घेऊन तिने कोश्यारी यांच्यासह, खुर्चीसह तसेच राजभवनात (Raj Bhavan) इतर ठिकाणी छायचित्रे काढली. नंतर तिने ती स्वत:च्या समूह माध्यमात शेअर केली आहेत. यावरुन मनसेने राज्यपालांना (Governor Bhagat Singh Koshyari) खडे बोल सुनावले आहेत.
मॉडेल मायरा मिश्राने राजभवनातले फोटोसेशन समूह माध्यमांवर व्हयरल केल्यानंतर त्यावर हंगामा सुरू झाला आहे. मनसेने (MNS) या फोटोसेशनवर तिव्र आक्षेप घेतला आहे. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी याविषयी ट्वीट केले आहे. त्यात ट्वीटसोबत त्यांनी मायरा मिश्राचा फोटो शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, “ठिकाण राजभवन – ही बाई कोण आहे? अभिनेत्री आणि मॉडेल राजभवनात काय करतेय? राज्यपालांच्या खुर्चीला मान सन्मान आहे की नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
या ट्विटमुळे राज्यपाल नव्या वादात सापडले आहेत. मायरा मिश्राने राज्यपालांच्या रिकाम्या खुर्चीला मागच्या बाजुने उभे रहात पोझ दिली आहे. तर अन्य एका छायाचित्रात ती राज्यपालांच्या अगदी जवळ उभे राहून फोटोसेशन केले आहे. राजभवनात बाहेरील व्यक्तींना वावरताना काही शिष्टाचाराचे (Protocol of Raj Bhavan) नियम आहेत. तसेच राजभवन ही वास्तु राज्याच्या राज्यपालांचे निवासस्थान आणि कार्यालय असल्याने येथे प्रत्येक गोष्ट राजशिष्टाचारानुसार करणे आवश्यक असताना मॉडेल अशा प्रकारे वावरताना राजभवनात कशी दिसू शकते? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यपालांना नव्या वादंगाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.