@maharashtracity
मुंबई: मुंबईतील गिरगाव चौपाटीवर दहा दिवसांच्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सायंकाळी ७.४४ ते ७.५१ या कालावधीत एकामागोमाग एक असे आगमन झाले. यावेळी, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी जातीने स्वागत केले.
त्यानंतर काही अवधीतच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही गिरगाव चौपाटीवर उपस्थिती दर्शवली. त्यानंतर, या सर्व मान्यवरांनी मुंबईतील मुख्य आकर्षण असलेल्या मोठ्या व आकर्षक गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी केली व गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
मुंबईत लाखो गणेश भक्तांच्या गर्दीत कोरोना चेंगरला
मुंबईत कोरोनावर नियंत्रण आल्यावर राज्य सरकारने सर्व निर्बंध हटवले. त्यामुळे यंदा दहीहंडीनंतर गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आले. मुंबई महापालिका, पोलीस व इतर यंत्रणेने दोन वर्षांपूर्वीप्रमाणे चांगली व्यवस्था केल्याने मुंबईकरांना गणेशोत्सव साजरा करता आला. यंदा मोकळीक मिळताच गणेश भक्तांनी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, कुर्ला, सायन, पवई तलाव , कृत्रिम तलाव आदी परिसरात लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती. गिरगाव चौपाटीवर तर लाखो गणेश भक्तांचा जणू जनसागरच लोटला होता.
या गणेशभक्तांच्या गर्दीतच मुंबईत गेले दोन वर्षे हैराण करणारा जो काही “कोरोना” शिल्लक आहे, तो कदाचित या गणेश भक्तांच्या श्रध्दारूपी गर्दीत पार चेंगरला असावा, असेच म्हणावे लागेल. कारण की, लाखो गणेश भक्तांनी कोरोनापासून बचाव होण्यासाठी ना मास्क घातला होता आणि ना सुरक्षित अंतर राखले होते. मात्र कोरोनाचे कोणतेच भय गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर कुठेच दिसत नव्हते.
गिरगाव चौपाटीवर लहान मुलांची चुकामुक
मुंबईतील मानाच्या व मोठ्या आकर्षक अशा अगदी लालबागच्या राजासह इतर प्रसिद्ध गणेशमूर्ती व विसर्जन पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी होते. या गर्दीत लहान मुले पालकांचा हात सुटल्याने त्यांची चुकामुक झाल्याच्या काही घटना घडल्या. मात्र पोलिसांनी ध्वनीक्षेपकाचा वापर करून त्या त्या लहान मुलांची पालकांशी भेट घडवून आणल्यानंतर त्या पालकांच्या व चुकलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.