uddhav

शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले

@maharashtracity

By Milind Mane

मुंबई: शिवसेना पक्ष हा कुणाच्या मालकीचा याबाबत निर्णय घेण्यास व धनुष्यबाण निशाण कोणाला द्यायची याबाबत कागदपत्रे सादर करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 8 ऑक्टोबर दुपारी दोन वाजेपर्यंत मुदत दिली आहे.

राज्यातील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व त्यातच शिवसेनेमध्ये दोन तट पडल्याच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार व या चिन्हावर कोणी निवडणूक लढवायची याबाबत राज्यात पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगासमोर केली होती.

आयोगाने उद्धव ठाकरे गटाला व शिंदे गटाला सात ऑक्टोबरपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्यास मुदत दिली होती. शिंदे गटाने कागदपत्र सादर केल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने 15 दिवसाची मुदतवाढ देण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने ती फेटाळून लावली.

राज्यात मुंबईतील शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिंदे गटाने जरी उमेदवार दिला नसला तरी शिंदे गटाचा पाठिंबा भाजपा उमेदवार व श्रीमती लटके यांचे प्रतिस्पर्धी मुर्जी पटेल यांना आहे. त्यामुळे भाजपा विरोधात शिवसेना असा जंगी सामना या पोटनिवडणुकीत होणार आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळू नये यासाठी शिंदे गटाने (Eknath Shinde group) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र दिले होते. त्यामध्ये राज्य विधानसभेतील शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 40 आमदार व लोकसभेतील 18 खासदारांपैकी बारा खासदार शिंदे गटाकडे असल्याने शिंदे गटच मूळ शिवसेना आहे अशी मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केली होती. त्यानुसार शिंदे गटाने 4 ऑक्टोबर रोजी आपली कागदपत्र सादर करून पूर्तता केली आहे.

तर मूळ शिवसेना असलेल्या उद्धव ठाकरे गटाने आपल्या सदस्यांची शपथपत्रे जमा केली असून विधिमंडळ पक्ष, लोकसभेतील पक्ष आणि संघटनेचे पदाधिकारी उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने असल्याचे 10 लाखाहून अधिक पक्षाचे प्राथमिक सदस्य असल्याचे प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे. तसेच प्रतिनिधी सभेतील 70 टक्के सदस्यही आपल्या बाजूने असल्याची प्राथमिक तयारी केली आहे. तर शिंदे गटाने 40 आमदार, 12 खासदार, 144 पदाधिकारी व 11 राज्य प्रमुख आणि एक लाख 66 हजार 764 प्राथमिक सदस्य असल्याचे प्रतिज्ञापत्रात उल्लेख केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट व शिंदे गट या दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्यात सात ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कागदपत्र सादर केली. मात्र, शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे ठाकरे गटाला अद्याप मिळाली नाहीत, या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुदत वाढीची मागणी केली.

28 सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पत्र पाठवून संबंधित कागदपत्रे आयोगाला सादर करण्यास सांगितले होते. शिंदे गटाने जरी कागदपत्र सादर केली असली तरी आयोगाला अभिप्रेत असलेल्या विविध नमुन्यात ती सादर केली नव्हती. त्यामुळे निवडणूक आयोगाने ती विहित नमुन्यात सादर करण्यात शिंदे गटाला सांगितले.

केंद्रीय निवडणूक आयोगाला (Election Commission of India) शिंदे गटाने विहित नमुन्यात सादर केलेली कागदपत्रे कोणती आहेत हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना गटाला समजल्याशिवाय आम्ही आमच्या गटाची कागदपत्रे कशी सादर करू, असा प्रश्न अर्जाद्वारे ठाकरे गटाने केला होता. त्यामुळे आम्हाला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

अखेर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला 8 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत आपली कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. शिवसेनेच्या गटाकडून कागदपत्रे सादर झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग काय भूमिका घेते, याकडे महाराष्ट्रसह संपूर्ण देशातील सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here