@maharashtracity
मुंबई: मुंबईचे माजी महापौर व मुलुंडमधील कांग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्रप्रसाद सिंह यांचे वडील रामचरित्र रामभजन सिंह (८६) (R R Sinh) याचे गुरुवार दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे २.४५ वाजेच्या सुमारास दीर्घ आजाराने मुलुंड येथील लक्ष्मी या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात, ५ मुले, २ मुली, जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने (Congress) एक चांगला अनुभवी व धडाडीचा नेता गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कॉंग्रेसमधील अनेक नेते, खासदर, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी शोक व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पित केली आहे.
ते १९७३ ते २००२ या कालावधीत (अनुक्रमे वार्ड क्रमांक १३८,१७० व २२० मधून) नगरसेवक पदावर कार्यरत होते. १९९३ – ९४ मध्ये त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले होते. त्यांनी महापौर असताना मुंबईसाठी काही नागरी विकासकामे पार पाडण्यात महत्वाचे योगदान दिले होते.
१९९३ – ९४ मध्ये मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना आर. आर. सिंह यांना कॉंग्रेसच्या तत्कालीन वरिष्ठ नेत्यांनी महापौर पदासाठी पसंती देत त्यांना महापौर बनवले. त्यावेळी महापौर पदाचा कार्यकाळ फक्त १ वर्ष इतकाच होता. मात्र सिंह यांनी त्यावेळी सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेऊन महापौर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली.
त्यांनी, आपल्या दीर्घकालीन नगरसेवक पदाच्या कार्यकाळात, स्थायी समितीवर (सन १९९१, १९९२ ) २ वर्षे, बेस्ट समितीवर (सन १९७३, १९७७, १९९० व १९९१) ४ वर्षे, स्थापत्य समिती (उपनगरे) वर (सन १९७६, १९७७ ) २ वर्षे, आरोग्य समितीवर (सन १९७३, १९७६ व १९७७) ३ वर्षे, अनुदान साहाय्य समितीवर (सन १९९०, १९९२, १९९३, १९९७ व १९९९) ५ वर्षे, मुंबई महानगर विकास प्राधिकरणावर (सन १९९५) १ वर्ष, महापालिका महत्व वाढीचे प्रश्न व महापालिका आणि महापौरांचे अधिकार वाढविण्यासाठी गठीत समितीवर (सन १९९०) १ वर्ष असे दिर्घकाळ विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम केले.
तसेच, नगरसेवक, महापौरपद भूषवतांना ते काँग्रेस पक्षात दीर्घकाळ कार्यरत होते. तसेच, मुंबई कांग्रेसचे प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यामुळेच ते काँग्रेस पक्षात एक ज्येष्ठ कांग्रेस नेते म्हणून परिचित होते. त्यांना कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक ‘बाबूजी’ या नावाने संबोधित असत.
ते आर. आर. एज्युकेशन ट्रस्ट आणि मुलुंड सिटिजन चॅरीटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहिले.
कै. आर.आर.सिंह ययांचे पार्थिव त्यांच्या मुलुंड (प.), मुलुंड पोलीस स्टेशन समोरील एन. एस. रोड येथील गायत्री कृपा निवासस्थानी दुपारी ३ ते ४ या कालावधीत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा मुलुंड निवासस्थान येथून मुलुंड (प.) स्मशानभूमी येथे काढण्यात येणार आहे.