मुंबई: ठाणे (Thane) शहर मतदारसंघात स्थानिक भारतीय जनता पार्टी (BJP) कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) स्वयंसेवक यांचा विरोध डावलून पक्षाने मावळते आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांना पुन्हा संधी दिली. पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा चेहरा, मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेले काम आणि प्रतिमा या जोरावर भाजप-शिवसेना युतीचे (BJP-Shiv Sena alliance) सरकार राज्यात पुनः सत्तारूढ होऊ शकेल, असे संकेत मिळत आहेत. याचाच (गैर) फायदा घेत केळकर अगदी निर्धास्त झाले आहेत, मतदारांपर्यंत पोहोचण्याचे ही कष्ट घेताना दिसत नाहीयेत आणि त्याचा फटका मुख्यमंत्री फडणवीस यांना बसला आहे.

ठाण्यात दोन दिवसांपूर्वी केळकर यांच्या प्रचारासाठी फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती. राज्यभर सभा गाजवणारे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सभेला होणारी गर्दी पाहता ठाण्यातील सभा हा एकदम फ्लॉप शो (Flop Show) ठरला. सभेतील निम्म्याहून अधीक खुर्च्या रिकाम्या होत्या. स्थानिक शिवसेना नेते खासजीत भाजप आणि केळकर यांनी खाजगीत खिल्ली उडवत असून ‘तुम्हाला गर्दी जमवता येत नसेल तर आम्हाला सांगितले असते, आम्ही जमवली असती,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

ठाण्यातील एक पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, या फ्लॉप शोचे खापर ठाणे भाजपवर फोडले जात आहे, हे दुर्दैव आहे.

“उत्साही मुख्यमंत्री आणि आत्मसंतुष्ट आयोजक, असेच याचे वर्णन करावे लागेल. हा फ्लॉप शो ठरला. ही सभा ठाण्यात पाचपखाडी या नौपाडा, चरई आणि खोपट लगत असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी झाली. हा परिसर भाजपचा बालेकिल्ला (bastion) असल्याचे बोलले जाते. त्यामुळे सभा हाऊस फुल्ल होईल, अशी खात्री बाळगली जात होती. सभा महापालिकेलगतच्या रस्त्यावर होती.

भाजपचे उमेदवार संजय केळकर हे विद्यमान आमदार आहेत. एका अंदाजानुसार सभेला अठराशे पेक्षा कमी उपस्थिती होती. सभेत उत्साहाचा पूर्ण अभाव होता. व्यासपीठावरून दिलेल्या घोषणांना श्रोत्यांमधून अजिबात प्रतिसाद मिळत नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण वगळता निवेदनासह अन्य भाषण निरुत्साही होती,” अशी महिती या पदाधिकाऱ्याने दिली.

तो पुढे म्हणाला, ठाण्यात मुख्यमंत्री सभेचे वातावरणच करण्यात अपयश आल्याचे चित्र दिसत होते. एक प्रकारची मरगळ होती. समविचारी व्यक्ती, संस्था, कार्यकर्ते यांना सभा असल्याचे माहीत नव्हते. शिवसेनेने संख्येवरून सभेची खिल्ली उडवणे स्वाभाविक होते.

“आम्हाला सांगायचे आम्ही केली असती, आमच्या मतदारसंघात केली असती” अशी प्रतिक्रिया संख्या बघून शिवसेनेने व्यक्त केल्याचे समजते. उमेदवाराने पुढाकार घेण्याऐवजी पालकमंत्री (Guardian Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्थानिक शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना फोन करून संख्या जमवली असे कळते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत आपल्या भाषणात भाजप उमेदवार संजय केळकर “नशीबवान” आहेत असा उल्लेख करून एक पॉज घेतला. त्यांच्या या टोल्याला व्यासपीठावर असलेल्या सर्वांकडून दाद मिळाली.

संख्या कमी येण्याच्या या प्रकाराला उमेदवार, उमेदवार नियुक्त मतदार संघ संयोजक सुभाष काळे, आणि त्यांची टीम जबाबदार असल्याची चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात होत आहे.

मुख्यमंत्र्यांची सभा आपल्या मतदारसंघात व्हावी यासाठी उमेदवारांना आग्रह धरावा लागतो, मागणी करावी लागते. मात्र, विनासायास मिळालेल्या सभेचा राजकीय लाभ उमेदवाराला घेता न येणे हे राजकीय अपयश मानले जाते. सभेचे तांत्रिक, व्यवस्थात्मक नियोजनही उमेदवार आणि त्यांच्या टीमवर नव्हते. एका माहितीप्रमाणे ते सगळं मुख्यमंत्री योजनेतून भाजप प्रदेश व्यवस्थेतून झाले होते. उमेदवाराने संख्येवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित होते. संख्या कमी येण्याचे खापर पक्षसंघटनेवर फोडण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे समजते. मनसे (MNS) समर्थक रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढताना दिसत होते. मनसे ठाण्यात होणारी राज ठाकरे (Raj Thackeray) सभा दणक्यात करण्याचे नियोजन करत आहे.

सोशल मीडियावर सभेच्या उपस्थितीवरून चर्चा सुरू झाली आहे. ठाण्यात सप्टेंबर महिन्यात गडकरी रंगायतन येथे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगतप्रसाद नड्डा (J P Nadda) यांच्या सभेला तीन हजार पेक्षा अधिक उपस्थिती होती. मात्र, मुख्यमंत्री असूनही संख्या कमी असल्याने आत्मसंतुष्टता त्रासदायक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

उमेदवार संजय केळकर यांना आपण जिंकणार असल्याची खात्री असल्याने सभा फेल गेल्याचा परिणाम उमेदवार व त्यांच्या समर्थकांवर होणार नाही, असे बोलले जात आहे. मतदारांना पर्याय नसल्याने ते जातील कुठे ? आमच्या कमळावरच शिक्का मारतील, अशी प्रतिक्रिया सभेनंतर व्यक्त झाल्याचे कळते.

राज्याची निवडणूक घोषित झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभांना वाढता प्रतिसाद असताना ठाण्यातील सभेने गालबोट लावले अशी चर्चा आहे. अनुकुलतेतून येणाऱ्या आत्मविश्वासाचे रूपांतर सुस्तीत होऊन मताधिक्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here