जेपींच्या संपूर्ण क्रांतीच्या घोषणेचे पन्नास वर्षे

By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: स्वातंत्र्य आंदोलनातील एक वलयांकित नेते, पुढे सत्तेचे राजकारण नाकारुन विनोबांच्या सर्वोदयाला वाहून घेतलेले जयप्रकाश नारायण (Lok Nayak Jayaprakash Narayan), यांनी आयुष्याच्या तिस-या पर्वात जनतेची सर्वंकष स्थिती सुधारावी, सत्तेसह बदल घडावा यासाठी संपूर्ण क्रांतीचा पुकारा केला. सारा देश त्यामुळे भारला गेला. देशात जणू दुसरा स्वतंत्रता संग्राम सुरू झाला. त्या संपूर्ण क्रांती (Total Revolution) घोषणेला सोमवारी ५ जून रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.

 तत्कालीन वातावरणात तळागाळापासून असंतोषाची खदखद होती. जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, बेरोजगारी, महाग शिक्षण आणि भ्रष्टाचार, हाच शिष्टाचार बनतोय हे पाहून विद्यार्थी वर्गात तीव्र असंतोष होता. तर हे ची फल काय मम तपाला, म्हणून स्वातंत्र्य आंदोलनात हाल अपेष्टा भोगलेली पिढी अस्वस्थ, उद्विग्न होती. याचा पहिला उद्रेक गुजरातमधून विद्यार्थ्यांच्या नवनिर्माण आंदोलनातून झाला. महागाई आणखी शैक्षणिक शुल्कवाढ यातून तत्कालीन चिमणभाई पटेल सरकार जनतेच्या रोषास कारण ठरले. तिथे विद्यार्थी आंदोलनाने शिखर गाठले. तसे देशभर वातावरण पसरु लागले. बिहारमध्ये छात्र संघर्ष वाहिनीने आंदोलनाची तिव्रता वाढवली. दिनांक १८ मार्च १९७४ रोजी बिहार विधिमंडळाला घेरावची हाक दिली गेली. नंतरच्या काळात बिहारमध्ये सत्तेची शिखरे गाठलेले बिहारचे सर्व नेते त्या आंदोलनात या विद्यार्थी नेते होते. पाटण्यातील ते आंदोलन, मूक मोर्चा यामुळे देशात अनेक राज्यात नव्या आंदोलनाची तयारी होत होती.

सर्वच विखुरलेल्या विरोधी पक्षांना १९७१ चे युद्ध जिंकलेल्या शक्तिमान इंदिरा गांधींचा मुकाबला करणे शक्य होत नव्हते. अशा स्थितीत राजकीय बदल घडला तरच सामाजिक, सांस्कृतिक बदल घडून देशात सुधारणा घडून येतील असा विचार जयप्रकाश नारायण करत होते. विद्यार्थी नेत्यांनी या महान स्वातंत्र्य सेनानीस आंदोलनाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. जेपींनी ती मान्य केली. त्यानंतर पाच जून १९७४, रोजी पाटण्याच्या गांधी मैदानात अतिविराट सभा झाली. जयप्रकाश नारायण यांनी तिथे संपूर्ण क्रांतीची हाक दिली. अवघा देश थरारून गेला. पुढचा इतिहास ज्ञात आहे. जेपींनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निवडणुका जिंकून दाखविण्याचे आव्हान स्वीकारले. सर्वपक्षीय राष्ट्रीय समन्वयक समिती निर्माण झाली. अगणित सर्वपक्षीय विरोधी नेते कार्यकर्ते त्यासाठी तुरुंगात गेले. त्यानंतर जेपी यांनी १९७७ साली देशात पहिले सर्वपक्षीय सरकार आणून दाखवले. स्वत: कोणतेही पद न घेता.

जेपींची ती इतिहास घडविणारी संपूर्ण क्रांतीची घोषणा, त्याला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. ही राजकीय घटना योग्य की अयोग्य याचे मूल्यमापन पुढेही होत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here