वेळेवर पाणी देण्यासह पाणीपट्टी माफ करण्याची मागणी
@maharashtracity
धुळे: पाणी टंचाईच्या (water scarcity) समस्येमुळे धुळेकरांचे प्रचंड हाल होत असताना सत्ताधारी भाजप खुर्ची सांभळण्यात मश्गूल आहेत. इकडे महिलांसह अबालवृध्दांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नागरिकांना आठ दिवसानंतरही वेळेवर पाणीपुरवठा होत नाही. अवघे 55 दिवस पाणी देऊन 365 दिवसांची पाणीपट्टी वसूल केली जाते. लोकांना वेळेवर पाणी द्या, पाणीपट्टी माफ करा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सोमवारी महापालिकेवर हंडा मोर्चा (Handa Morcha) काढला. यावेळी मोर्चातील महिलांनी महापालिकेचा व सत्ताधारी भाजपाचा (BJP) निषेध करत प्रवेशद्वारावर मातीचे मडके फोडले.
राष्ट्रवादीच्या निवेदनानुसार, शहरात आठ ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. दुर्गम पाड्याप्रमाणे लोकांना हंडे घेवून दुरून पाणी आणावे लागत आहे. महिलांसह लहान मुलांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. महापालिका व सत्ताधारी भाजपासाठी ही शरमेची बाब आहे. भाजपा सत्तेत येवून तीन वर्षे झाले. परंतु, भाजपचे पदाधिकारी हे सत्ता व खुर्चीत मश्गूल आहेत. राज्य सरकारने पाणीप्रश्नासाठी वेळोवेळी महापालिकेला कोट्यावधी रुपयांचा मदतनिधी दिला. परंतु, मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. वर्षातून केवळ 55 दिवस पाणी पुरवठा होत असेल नागरिकांनी 365 दिवसांची पाणीपट्टी का भरावी? एक दिवसाआड पाणी देण्याची वल्गना करणारे गिरीश महाजन (Girish Mahajan) आता कुुठे आहेत? असा जाबही यावेळी विचारण्यात आला.
धुळेकर (Dhule) जनतेला वेळेवर पाणीपुरवठा न केल्यास भाजपच्या पदाधिकार्यांना महापालिकेच्या दालनात बसू देणार नाही, असा इशाराही यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी दिला. यावेळी संपूर्ण शहरातील नागरिकांची पाणीपट्टी माफ (waiver of water tax) करावी, अशी मागणीही करण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, कमलेश देवरे, शोभा आखाडे, जया साळूंखे, अॅड. तरुणा पाटील, चेतना मोरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.