By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: शरद पवार यांनी भाजपावर नैतिकतेसंबंधी केलेल्या विधानाचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे खरपूस समाचार घेतला. त्यांनी भाजपाला नैतिकता शिकवायची ठरविली, तर कठीणच होईल आणि मग वसंतदादांच्या सरकारच्या काळातील इतिहासापासून सुरुवात करावी लागेल, असा टोला त्यांनी लगावला.

नागपूर येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार साहेबांचा नैतिकतेशी संबंध तरी आहे का? त्यांनी भाजपाला नैतिकता शिकवायचे ठरविले तर कठीणच होईल. त्यासाठी इतिहासात जावे लागेल. वसंतदादांचे सरकार कसे पडले, येथून सुरुवात करावी लागेल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायचे नसते.

पत्रकारांनी उद्धव ठाकरेंबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. नरेंद्र मोदीजींचे फोटो लावून जे निवडून आले आणि केवळ मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी विचार, युती आणि पक्ष सोडला, ते कोणत्या नाकाने नैतिकता सांगतात? निकाल त्यांच्या बाजूने असेल तर त्यांनी आनंदोत्सव करावा.

माजी पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांच्या निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय प्रशासकीय लवाद, कॅटचा निर्णय आल्याने, त्या आदेशानुसार त्यांचे निलंबन मागे झाले आहे. त्यांच्याविरुद्धची विभागीय चौकशी बंद करण्याचे आदेश सुद्धा कॅटने दिले होते.

सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निकालासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे यासंदर्भातील सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत. ठराविक कालावधीत तो घ्यावा, असेही सांगितले आहे. त्यामुळे अशाप्रकारे अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर ते ‘फ्री अँड फेअर’ न्यायप्रक्रियेत बसत नाही. मला वाटत नाही की अध्यक्ष कोणत्याही दबावाला बळी पडतील. ते स्वत: एक निष्णात वकील आहेत. जे कायद्यात आहे, संविधानात आहे आणि जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे, त्यानुसारच ते निर्णय घेतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here