@maharashtracity
नागपूर: जी. एन. साईबाबाप्रकरणी (G N Saibaba) आजचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल हा शहीदांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज रात्री नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, नक्षलवाद्यांशी (Naxali) लढताना ज्यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा या लढ्यातील जे पोलिस, जवान शहीद (Martyrs) होतात, त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक आहे. या निकालाविरोधात आम्ही तातडीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेलो आहोत. ज्याच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत, त्याला केवळ विलंबाने खटल्याची परवानगी मिळाली, या एका तांत्रिक कारणामुळे सोडून देणे, हा त्या शहीद कुटुंबांप्रति अन्यायकारक आहे. हे आम्ही सारे सर्वोच्च न्यायालयात योग्यप्रकारे मांडू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. या निकालामुळे त्या कुटुंबीयांना काय वाटत असेल, याचा विचार मी वारंवार करतो आहे, असे फडणवीस म्हणाले.