@maharashtracity
मुंबई: सध्या मुंबईत होत असलेल्या बालभवनच्या उपक्रमांची व्याप्ती येत्या वर्षापासून राज्यभरात वाढविण्यात येणार असून त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज केली.
मंत्री केसरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन (Bal Bhavan) मुंबईच्यावतीने आयोजित विविध सहशालेय स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आली. रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमात मंत्री केसरकर म्हणाले की, देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचा जन्मदिन बाल दिन म्हणून साजरा केला जातो. यामुळेच मुंबईतील बालभवनला त्यांचे नाव दिले गेले. यापुढे बालभवनचे उपक्रम राज्यात सर्वत्र राबविण्यात येतील. मुंबईतील बालभवन इमारतीच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने विविध उपक्रमांसाठी संस्थेला जोगेश्वरी येथील शिक्षण विभागाची जागा तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रमांतही सहभाग घ्यावा
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमांमध्येही सक्रीय सहभाग घ्यावा, यामुळे व्यक्तिमत्व विकास (personality development) होतो, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि कौशल्य आधारित प्रशिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने एचसीएल (HCL) आणि टीआयएसएस (TISS) या संस्थांसोबत करार केले असून आरोग्य चांगले राहण्यासाठी आजच ‘इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रीक’ सोबत करार करण्यात आल्याची माहिती केसरकर यांनी दिली. मातृभाषेतून दिलेले शिक्षण प्रभावी ठरते. यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यावर शासन भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.