@vivekbhavsar
मुंबई: तत्कालीन खासदार दिवंगत मोहन डेलकर (Mohan Delkar) यांच्या मुंबईत (Mumbai) येऊन केलेल्या आत्महत्येचे राजकीय भांडवल करण्याची साधलेली वेळ, पोटनिवडणूकित स्वर्गीय डेलकर यांच्या पत्नीला पक्षाकडून उमेदवारी देऊन भाजपविरोधी (BJP) भावनेचा पक्षासाठी करून घेतलेला फायदा आणि या सगळ्या घडामोडीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बजावलेली भूमिका, या साऱ्याचा परिपाक म्हणजे शिवसेना (Shiv Sena) उमेदवार कलाबेन डेलकर यांचा दादरा – नगर -हवेली (Dadara – Nagar – Haweli) लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत झालेला विजय असे म्हणता येईल.
अर्थात सतत सात वेळा या मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व केलेले स्वर्गीय मोहन डेलकर यांची या मतदार संघावर असलेली पकड ही देखील या विजयात मोलाची कामगिरी बजावणारी ठरली.
या विजयाचे शिल्पकार ठरलेले शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी “संसदेत त्यांची संख्या 22 वरून 23 झाल्याची आणि 2024 च्या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीनंतर देशात एकपक्षीय सरकाराचे दिवस बदललेले असतील” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेला महाराष्ट्राबहेर मिळालेला हा पहिला विजय आहे. या आधी शिवसेनेने उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 2012 आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. बिहारमध्ये (Bihar) सेनेने 2015 आणि 2020 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिले होते. 2020 मधील निवडणूकीत “‘नोटा’ला (NOTA) पडलेल्या मतांपेक्षा कमी मते सेनेला मिळाली होती.
शिवसेनेला गोव्यात (Goa) 2017 च्या निवडणुकीत 2 टक्केपेक्षा कमी मते मिळाली होती. कर्नाटकात (Karnataka) बेळगावी लोकसभा पोटनिवडणूकित भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (MES) उमेदवाराला पाठिंबा दिला होता.
या सर्व निवडणुकीत शिवसेनेला अपयश बघावे लागले. त्यामुळे दादरा -नगर – हवेली पोटनिवडणूक निकालाचे काहीही कारणे असली तरी शिवसेनेसाठी हा निकाल उत्साह वाढवणारा ठरला आहे.
“कलाबेन डेलकर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. “मोहन डेलकर आमचे सहकारी होते, सात वेळा निवडून आले होते. त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. त्या आत्महत्येच्या मागे दादरा नगर हवेलीत भाजपने बसवलेले प्रशासक प्रफुल छेडा पटेल यांची हुकुमशाही कारणीभूत आहे. आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात तिथे लढाई केली. तिथल्या मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात भरभरून मतदान केलं. आतापर्यंत तिथं एवढा विजय कुणाला मिळाला नव्हता. शिवसेनेचे महाराष्ट्राच्याबाहेर दमदार पाऊल आहे. बरेच वर्ष आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर विजयाची प्रतिक्षा करत होतो, ती संधी इथे मिळाली. आता दमन, दक्षिण गुजरातमध्ये काम करतोय, गोव्यात काम करतोय. २२ खासदार असलेला आमचा पक्ष राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आता आमची संख्या २३ झाली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशाचं चित्र बदललेलं असेल. एक पक्षीय सरकारचे दिवस २०२४ मध्ये संपतील आणि पुन्हा एकदा आकड्यांचा काळ सुरू होईल.”
- संजय राऊत, शिवसेना