7/12 नाही, मागणी नाही, तरीही ‘बोगस’ लाभार्थींच्या खात्यात किमान दोन लाख जमा

मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पॉवरफुल मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) आणलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला (Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Yojna) भ्रष्टाचाराची (corruption) कीड लागली आहे. ज्यांच्या नावावर सात-बारा उतारा नाही (म्हणजेच ज्यांची शेती नाही), ज्यांनी कर्जमुक्तीसाठी सरकारकडे अर्ज केलेला नाही,  अशा लोकांच्या बँक खात्यावर किमान ९८ हजार ते दोन लक्ष रुपये जमा झाले आहेत. गाव विकास सोसायटीपासून ते राजकीय नेते आणि बँक अधिकारी या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप जागरूक नागरिक सूरज शेवाळे यांनी केला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी सांगली प्रकरण हे भ्रष्टाचाराचे हिमनगाचे टोक असल्याचं आरोप करुन संपूर्ण राज्यातील या योजनेच्या लाभार्थ्यांची (beneficiaries) चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे.


TheNews21 च्या हाती लागलेल्या कागदपत्रानुसार, सांगलीच्या वाळवा तालुक्यातील गोटखिंडी या सुमारे १२,००० लोकवस्तीच्या गावात मागणी न करताही काही लोकांच्या बँक ऑफ इंडिया (Bank of India) आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Sangli District Co-op Bank – DCC bank) बचत खात्यात कर्जमुक्ती योजनेतून रक्कम जमा झाल्याची कुणकुण गावातील जागरूक नागरिक सूरज संभाजी शेवाळे यांना लागली आणि त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला.


तलाठीने लिहून दिले

TheNews21 शी बोलतांना शेवाळे म्हणाले, “गोटखिंड या आमच्या गावात काही लोकांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला. त्यात काही लोकांकडे शेतजमीन नाही, असे आमच्या लक्षात आले. तेव्हा आम्ही गावाच्या तलाठीकडे १६ लोकांचे सात-बारा उतारे मागितले. तलाठ्याने सही शिक्यानिशी लिहून दिले आहे की कर्जमुक्तीचा लाभ मिळलेल्या ९ लोकांकडे सात-बारा उतारा नाही. शेतकरी नाहीत, शेतीचा काही संबंध नाही, तरीही या लोकांच्या खात्यात किमान रु ९४,००० ते रु १,९७,००० कसे जमा झाले? असा प्रश्न शेवाळे यांनी उपस्थित केला आहे.


कोण आहेत ते लाभार्थी?

१. ज्योती दीपक थोरात २. राणी दिनकर देसाई ३. अर्चना दीपक थोरात ४. सुवर्णा रविंद्र थोरात ५. कांचन शिवाजी गावडे ६. रुपाली किसन जाधव ७. रामेजबी हनिफ पठाण ८. विजय भाईमराव ढवळे ९. किसन रंगराव जाधव

मागणी न करता मिळाले तब्बल २ लाख रुपये

हनिफ पठाण यांची ४० गुंठे शेतजमीन आहे. पण त्यांच्या नावावर कुठल्याही बँकेचे कर्ज नाही. त्यांनी कर्जमुक्तीसाठी प्रयत्न केला नाही. तरीही त्यांच्या बँक खात्यात रु. १,९४,९९०  इतकी रक्कम जमा झाली आहे. तर त्यांची पत्नी रामेजबी हनिफ पठाण यांच्या नावावर सात बारा उतारा नाही. तरीही त्यांच्या बँक खात्यात रु. १,६७,३९५ इतकी रक्कम जमा झाली आहे.

कुंपणच शेत खातंय!
संग्राम संभाजी थोरात, दीपक संभाजी थोरात, सिंधुताई संभाजी थोरात या तीन जणांच्या नावावर जेमतेम ४-५ गुंठे जमीन आहे. असे असतांना सिंधुताई थोरात यांना रु. १,२९,१८९ आणि दीपक थोरात यांना रु. १,३०,७४७ इतकी रक्कम कर्जमुक्तीच्या नावाखाली देण्यात आली आहे. 

संग्राम संभाजी थोरात यांच्या दोन बँक खात्यात वेगवेगळ्या रकमा जमा करण्यात आल्या. त्यापैकी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक खात्यात रु. १,२९,७५० आणि बँक ऑफ इंडियाच्या खात्यात रु. १,३७,२१५ अशा रकमा कर्जमुक्तीच्या नावाखाली मिळाल्या आहेत. 

अत्यल्प जमीन असतानाही काही लाभार्थीना मोठ्या रकमेची कर्जमुक्ती देण्यात आली आहे. दीपक संभाजी थोरात हे ‘महादेव विविध कार्यकारी (विका) सोसायटी’चे सचिव आहेत. याच थोरात कुटुंबातील- ज्योती दीपक थोरात, अर्चना दीपक थोरात या दोघींच्या नावावर ७-१२ नसताना त्यांनाही अनुक्रमे रु. १,०२,४११ आणि रु. १,३२,०४४ इतकी कर्जमाफीची रक्कम वळवण्यात आली आहे.

‘गोटखिंडी विका सोसायटी’चे चेअरमन धनाजी दत्तात्रय थोरात यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँक खात्यात  रु. १,९०,६४९ तर बँक ऑफ इंडियाच्या खात्यात रु. १,३३,४९४ अशा दोन वेगवेगळ्या रकमा कर्जमाफीच्या नावाखाली जमा करण्यात आल्या आहेत. शरद बाबासाहेब थोरात (संचालक) यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातही रु. ७१,५९३ इतकी रक्कम आली आहे.
‘गोटखिंडी विका सोसायटी’चे सचिव अनिल पाटील यांच्या पत्नी मनीषा अनिल पाटील यांच्या नावावर ७-१२ नाही. मात्र त्यांच्याही खात्यावर कर्जमाफीची रक्कम आली आहे. सोसायट्यांचे हे पदाधिकारी बोगस व्यवहार करत आहेत, असा गोटखिंडीतील स्थानिक शेतक-यांचा आरोप आहे.

मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे

पोलीस अधिकाऱ्याचीही कर्जमुक्ती?
कर्जमाफी योजनेतून शासकीय नोकरदारांना वगळण्यात येईल, असे कर्जमुक्ती योजनेत स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील रहिवासी आजी पुण्यात पोलीस उपनिरीक्षक असलेल्या एका व्यक्तीला, त्याच्या नावावर शेतजमीन नसतांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे.
मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी हा प्रश्न धसास लावण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. 

“जिल्हाधिकारी (district collector) यांनी  गोटखिंडी आणि आसपासच्या गावांतील कर्जमुक्ती योजनेतील गैरव्यवहाराची तसेच योजना अंमलबजावणीतील त्रुटींची तत्काळ चौकशी करावी. तसे  आदेश संबंधित यंत्रणांना द्यावेत व कर्जमाफीची रक्कम ख-या गरजू शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, यादृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here