Twitter: @NalavadeAnant
सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे ठोस उत्तर मिळत नाही. कदाचित दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत म्हणून तर दोन दिवस सभागृहाचे कामकाज बंद ठेवले नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याची शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली.
विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सोमवार व मंगळवार या दोन दिवसात कामकाज होणार नसून त्यादिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय का घेतला याचे सविस्तर उत्तर मात्र दिलेले नाही. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत, त्यावर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशन पुर्णवेळ व ठरलेल्या कार्यक्रमानुसार व्हावे अशी मागणी काँग्रेस पक्षाने सातत्याने केलेली आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट उभे ठाकलेले आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत. पण या सरकारला जनतेच्या प्रश्नांची चिंता नसून दिल्लीतून येणाऱ्या ‘आका’ची जास्त चिंता असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.