Twitter : @maharashtracity

मुंबई: पूर्वी कायम सभागृहात प्रश्नोत्तर तासाला बाकीची सर्व कामे बाजूला ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री जातीने हजर राहायचे. विधिमंडळ कामकाज हे सर्वोच्च आहे, या ठिकाणी जनतेचे प्रश्न सोडवले जातात. निदान प्रश्नोत्तर तासाला तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी उपस्थित राहणे आवश्यक. मात्र हा संकेत सध्या पाळला जात नाही, अध्यक्षांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला सक्त शब्दात ताकीद दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ काँग्रेस सदस्य बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभा कामकाज सुरू होतानाच बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत्री अनुपस्थिती असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे सर्वोच्च सभागृह आहे. राज्यातील प्रश्न इथे मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. या माध्यमातून शासन आणि यंत्रणा त्यामुळे गतिमान होते. या अगोदर कायम प्रश्नोत्तराच्या तासाला बाकीची कामे बाजूला ठेवून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री जातीने हजर राहत असत.

थोरात म्हणाले, आता जर मुख्यमंत्रीच प्रश्नोत्तर तासाला सभागृहात येणार नसतील तर सदस्य आपली कामे घेऊन त्यांच्या दालनात जातील. सभागृहात त्यामुळे उपस्थिती कमी होईल, तसेच ज्या सदस्यांना प्रश्न मांडण्याची संधी मिळाली आहे त्यांचेही प्रश्न सुटणार नाहीत.

लक्षवेधी सुचना वेळीही बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांच्या अनुपस्थितीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ज्या – त्या खात्याचे मंत्री जर उपस्थित नसतील तर मग लक्षवेधीला अर्थ काय उरतो. मंत्री जर असे सांगत असतील की सकाळी सहा वाजता मला उठावे लागते, तर सकाळी उठण्यात की उशिरापर्यंत काम करण्यास वावगे काय? आपण मंत्री झालो आहोत, त्यामुळे या गोष्टी कराव्याच लागतात. मंत्रीपदाच्या मोठेपणात या सर्व गोष्टी दडलेल्या आहेत. सभागृहातील कामकाज मंत्री महोदयांनी गांभीर्याने घ्यावे, अभ्यास करावा, सदस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करावा अशी टिप्पणीही ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here