@NalavadeAnant
मुंबई
देशपातळीवर विरोधी पक्षांची मजबूत एकजूट झालेली असून इंडिया या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भाजप विरोधी पक्षांची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या तयारीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. मुंबईतील बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील बैठकीसाठी तयारी सुरु असून काँग्रेस पक्ष या बैठकीसाठी सज्ज असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, आ. शशिकांत शिंदे, आ.संग्राम थोपटे, आ.रोहित पवार, आ. सुनिल भुसारा आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, इंडियाची पहिली बैठक पाटण्यात झाली तर दुसरी बैठक बेंगलुरु येथे नुकतीच पार पडली. या दोन्ही बैठकांना शरद पवार उपस्थित होते. तिसरी बैठक मुंबईत होणार असून या बैठकीला देशभरातून जवळपास १०० महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यात काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, विविध पक्षांचे वरिष्ठ नेते असणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी शरद पवार यांनी फोनवरून चर्चा केल्याप्रमाणे मुंबईत होणारी इंडियाची बैठक यशस्वी करण्यावर महाविकास आघाडी म्हणून आमचा सर्वांचा भर असणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी मजबूत आहे. पावसामुळे मविआच्या सभा थांबलेल्या आहेत. पावसाळा संपताच या सभा पुन्हा सुरु होणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षही राज्यभर सभा घेणार आहे. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसंदर्भात चार-पाच बैठका घेतलेल्या आहेत. तीनही पक्ष एकत्र बसून चर्चा होईल तेव्हा जागा वाटप व उमेदवार निश्चित करण्यावर चर्चा होईल, असेही पटोले नमूद केले.