Twitter : @maharashtracity
मुंबई: देशात 1975 मध्ये लावण्यात आलेल्या आणीबाणीला 25 जून रोजी 48 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने देशभर स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कॉँग्रेसवर टीका केली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या कॉँग्रेसची भाजपला प्रत्युत्तर देताना आणि खुलासा करताना तारांबळ उडत आहे. तशात महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेससचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आणीबाणीचा संबंध अमेरिका-व्हिएतनाम युद्धाशी जोडला आणि भाजपला इतिहास नसल्याने त्यांना आणीबाणीवर बोलण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य केले.
नाना पटोले म्हणाले, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू केली होती, याचा खरं तरं भाजपाने नीट अभ्यास करायला पाहिजे. भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार? १९७५ मध्ये अमेरिका-व्हिएतनाम युद्ध सूरू होते आणि त्याच वेळी देशामधील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचले होते, काही लोक जाणीवपूर्वक चिथावणी देत होते. इंदिराजींनी आणीबाणी लावली नसती तर देशात लोकशाही राहिली नसती. इंदिरा गांधी यांनी १८ महिन्यानंतर आणीबाणी उठवली व निवडणुकाही घेतल्या. इंदिरा गांधी लोकशाहीच्या पाईक होत्या म्हणून लोकशाही वाचली, असाही दावा त्यांनी केला.
काँग्रेसने आणीबाणीबद्दल नंतर माफीही मागितली आहे. पण आता देशात काय चालले आहे? आणीबाणी पेक्षाही भयानक परिस्थिती आहे. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून कारभार सुरु आहे. ९ वर्षापासून देशात अघोषीत आणीबाणी सुरू असून त्यावर भाजपाने आधी बोलले पाहिजे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यावर कारवाई केली जाते, सरकारी तपास यंत्रणाचा वारेमाप गैरवापर सुरु आहे, विरोधकांची दडपशाही सुरु असून सरकार विरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. आणीबाणीच्या नावाखाली भाजपा तरूणांना भडकवत आहे ते त्यांनी थांबवावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.