Twitter : @vivekbhavsar
महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दावा केला आहे की त्यांच्या पक्षाला येत्या लोकसभा निवडणूकीत एकट्याच्या २५ जागी यश मिळेल. शरद पवार यांचा गट महा विकास आघाडीचा घटक राहुल की नाही याबद्दल शंका व्यक्त करून हा नेता म्हणाला की, महाविकास आघाडी एकत्र राहिली तर काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मिळून ४० जागा निवडून येतील, भारतीय जनता पक्षाला आताच्या घडीला ८ जागा जिंकणेसाठी संघर्ष करावा लागणार आहे, असाही दावा या नेत्याने केला.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसल्याचे नमूद केले आहे, याकडे लक्ष वेधताना काँग्रेसचा हा नेता म्हणाला की पवारांचा गट लोकसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असेल की नाही याबद्दल आमच्या मनात शंका आहे. या नेत्याने असाही दावा केला की खरे तर राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडावी, अशीच आमची आता इच्छा आहे. पवार यांची देहबोली आणि महाविकास आघाडीच्या बैठकीतील त्यांचे मौन पाळणे हे बरेच काही सांगून जाते, असा दावा काँग्रेसच्या या नेत्याने केला.
ते महणले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये केलेल्या भाषणाला तुम्ही हलक्याने घेऊ नका, मोदी यांनी त्यांच्या भाषणातून शरद पवार यांनाच थेट इशारा दिला होता आणि त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार यांचा गट शिंदे – फडणवीस सरकार मध्ये सहभागी झाला. एकीकडे नऊ मंत्र्यांच्या अपात्रतेसंदर्भात पत्र द्यायचं आणि दुसरीकडे पक्षात फूट पडलीच नाही, असे म्हणायचे ही पवारांची नीती बरेच काही सांगून जाणारी आहे, असा दावा काँग्रेसच्या या नेत्याने केला.
ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यावर विसंबून राहून भाजपला लोकसभेमध्ये पुरेसे संख्याबळ मिळणार नाही, याची खात्री पटल्यानेच भाजपच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना भाजपमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला.
असे असले तरी गाव पातळीवर भाजप आणि मोदी यांच्या विरोधात वातावरण आहे, काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे, तसा भाजप किंवा शिवसेनेचा नाही, राष्ट्रवादीचा तर अजिबातच नाही. तशात गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदी सरकार विरोधात विरोधाचे वातावरण तयार झाले आहे. २०14 ते 2019 या कालावधीमध्ये मोदी यांच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. भाजपची टीम त्यांच्यावर तुटून पडायची. आता मात्र समाज माध्यमांवर मोदींची यथेच्छ टिंगल टवाळी केली जाते, याकडेही या नेत्याने लक्ष वेधले.
या नेत्याने सांगितले की राज्यात आणि देशात मोदी यांच्या विरोधात वातावरण आहे, त्याचा फटका महाराष्ट्रात भाजपला बसू शकतो. काँग्रेससाठी अत्यंत पोषक वातावरण असून आम्हाला नवीन फळी निर्माण करण्याची संधी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडूनच दिली आहे.
हा नेता म्हणाला की मी राज्यभर फिरतो, लोकांशी बोलतो, त्यावेळी बदललेलं राजकीय वातावरण लक्षात येतं. अनेक ठिकाणी आम्हाला संधी आहे. एकंदरीत अंदाज घेतला तर या घडीला काँग्रेसचे 25 खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. महा विकास आघाडी एकत्र राहिली तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून राज्यातील 40 जागा आम्ही जिंकून दाखवू, भाजपला आठ जागा जिंकण्यासाठी देखील कष्ट करावे लागतील असा दावा या नेत्याने केला.