@maharashtracity
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मानेचे दुखणे बळावले असून त्यावर रुग्णालयात दाखल होऊन उपचार केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे ठाकरे हे एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये (Reliance Hospital) दाखल झाले आहेत. ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे समजत आहे. (CM Thackeray admitted in hospital)
एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये डॉ. शेखर भोजराज मुख्यमंत्र्यांवर उपचार करणार असल्याचे समजते.
दरम्यान, डॉक्टरांनी मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता रुग्णालयात दाखल होवून उपचार घ्या असे सुचवल्याने दोन तीन दिवस रुग्णालयात उपचार घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या आवाहनात म्हटले आहे.
यावेळी ठाकरे म्हणाले की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोविडचा (covid) मुकाबला करत असताना सर्वांचे जीवनचक्र सुरू ठेवण्यासाठी तसेच राज्यातील विकास काम सुरु ठेवण्यासाठी कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न सुरु होते. या काळात मान देखील वर करायला वेळ मिळत नसल्याने मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष झाले.
ठाकरे यांनी सांगितले की यातून मानेवर दुष्परिणाम झाला. मात्र या दुखण्यावर व्यवस्थित उपचार करण्यासाठी तसेच डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून आज रुग्णालयात दाखल होत आहे. आगामी दोन तीन दिवस रुग्णालयात दाखल होऊन उपचार करुन घेणार असल्याचे सांगण्यात आले. जनतेच्या आशिर्वादाने तब्येत लवकरच बरी होईल अशी खात्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, राज्याने १० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला असला तरी सर्वांनी लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. जीवन सुरक्षित करण्यासाठी जवळच्या केंद्रावर जाऊन लस घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.