By सदानंद खोपकर

@maharashtracity

मुंबई: असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री होणे बरे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना कंत्राटी मुख्यमंत्री संबोधणा-यांना दिला. ते विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत होते. ते म्हणाले, होय, मी महाराष्ट्र विकासाचे, राज्य अधिक समृद्ध करण्याचे, गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचे, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार पुढे नेण्याचे आणि बहुजनांचा सर्वांगीण विकास करण्याचे कंत्राट घेतले आहे.

मुख्यमंत्री शिंदे भाषणात म्हणाले की, आमच्याकडे बहुमत आहे, भाडोत्री फौजफाट्याची आम्हाला गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाचा डंका जगात गाजविला. याचसाठी आणि कॉंग्रेस -राष्ट्रवादीसोबत (Congress-NCP) जाणे नाही या बाळासाहेबांच्या भुमिकेसाठी आम्ही मोदीजीसोबत आहोत.

नीती आयोग (NITI Aayog) बैठकीला आपण उपस्थित होतो. पण फोटोच्या समयी तिसऱ्या रांगेत उभे राहण्यावरून टीका झाली. पण आमच्यासाठी रांग महत्वाची नाही, काम महत्त्वाचे आहे असेही शिंदे म्हणाले. नीती आयोग बैठकीनंतर राज्यासाठी हजार कोटी देण्याचे आश्वासन मिळाले, शिक्षण, आरोग्य, विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे, याचीही माहिती त्यांनी दिली. देशाला महासत्ता बनविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत, तुमचा विरोध आहे का, असा खोचक सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here