@maharashtra.city

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्वतः मान्यता – उदय सामंत

मुंबई: महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी बांधलेल्या किल्ल्यात असलेल्या देवळांना दिवाबत्तीसाठी प्रारंभी पेशवे (Peshava) आणि नंतर ब्रिटिशांनी (British) मजूर केलेल्या वार्षिक निधीत फारच तुटपुंजी वाढ झाली होती. याची दखल घेऊन या निधीत सन्माननीय वाढ करण्याचा तत्वतः निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला आहे.

सिंधुदुर्ग (Sindhudurg‍ )जिल्हयातील मालवण (Malvan) येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात उभारलेला सिंधुदुर्ग किल्‍ला आहे. या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुरातन मंदिरही आहे. मात्र इतकी वर्षे या मंदिराला शासनाकडून केवळ ६ हजार ३० रूपयांचे तुटपुंजे वार्षिक अनुदान देण्यात येत होते. ते आता वाढवून ३ लाख रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्‍याला तत्‍वतः मंजुरी दिली असल्‍याची माहिती माजी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६६४ साली हिरोजी इंदुलकर यांना सिंधुदुर्ग किल्‍ला बांधण्याची आज्ञा दिली. मालवण किनाऱ्याच्या समोरच कुरटे बेट आहे. याच कुरटे बेटावर हा अभेद्य जलदुर्ग बांधण्यात आला. या किल्ल्याचा तटबंदीच्या भिंतीची पायाभरणी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्‍ते झाली होती.

कुरटे बेटाच्या ४५ एकर क्षेत्रफळावर हा किल्‍ला विस्‍तारला आहे. या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्‍हणजे या किल्‍ल्‍यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर आहे. सन १६९५ साली शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांनी हे मंदिर बांधले. आजही हे मंदिर किल्‍ल्‍यात आहे.

त्‍याचसोबत आणखीन एक आकर्षण म्‍हणजे किल्‍ल्‍याच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्‍यानंतर महाद्वाराच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या भिंतीवर दोन दिवळया असून तिथे एका दिवळीत शिवाजी महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा तर दुसऱ्या दिवळीत उजव्या हाताचा ठसा आहे असे म्‍हटले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासोबतच किल्ल्यात महादेव, भवानी, महापुरूष, जरीमरी हनुमान अशी सहा मंदिरे आहेत. या मंदिरांची दैनंदिन पुजाअर्चा, दिवाबत्‍ती, डागडुजी,वर्षभरात साजरे होणारे बारा प्रमुख उत्‍सव या साऱ्यांचे व्यवस्‍थापन श्री शिवराजेश्वर देवस्‍थान न्यासाच्या मार्फत करण्यात येते. त्‍यासाठी महाराष्‍ट्र सरकारकडून वार्षिक ६ हजार ३० रूपये इतकेच अनुदान देण्यात येत होते. सध्याच्या महागाईच्या जमान्यात हे सर्व पुर्वपरंपरेनुसार दिमाखात चालविण्यासाठी निधीची अत्‍यंत कमतरता भासत होती.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा विषय उपस्‍थित केल्‍यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने हा निधी ३ लाखांपर्यंत वाढविण्यास तत्‍वतः मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासननिर्णय लवकरच जारी होईल, अशी माहिती माजी मंत्री उदय सामंत यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here