@maharashtracity

मुंबई: राज्यातील सरकार बदलले आहे, आता मुंबईचे रूपही बदलणार, अशी ग्वाही देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुढील दोन अडीच वर्षात मुंबईतील रस्ते पूर्णपणे  काँक्रीटचे करण्यात येतील. रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त असतील आणि रस्त्यांमध्ये पाणी तुंबणार नाही, असा विश्वास मुंबईकर अणि बांधकाम व्यावसायिक, उद्योगपती यांना दिला.

गोरेगाव येथील एसटेक प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  म्हणाले की, आयकॉनिक इमारती उभारण्यात आल्या पाहिजेत. त्याचवेळी मुंबईचा इतिहास आणि वैभव देखील जपण्यात येईल. 

5000 किमीचे एक्सेस कंट्रोल रस्ते

ते म्हणाले, राज्यात 5000 किमीचे एक्सेस कंट्रोल रस्ते तयार करण्यात येणार आहेत. मुंबई- गोवा ग्रीनफील्ड महामार्गाच्या (Mumbai – Goa Greenfield Highway) कामाचा डीपीआर तयार झाला आहे. तसेच क्लस्टर विकासाला (cluster development) गती देण्यात येत आहे, मुंबई झोपडीमुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रीमियम, मुद्रांक कर, युनिफाईड विकास नियंत्रण नियमावली या माध्यमातून विकासकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे असेही ते म्हणाले. रिअल इस्टेट क्षेत्र शेतीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. त्यामुळेच या क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारने अनेक सुविधा दिल्या आहेत. आमची पंचसूत्री महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची आहे.

एमएमआरडीएचे एक लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्प

एमएमआरडीएचे एक लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. आज दरवर्षी 25 हजार कोटींची कामे होतील, अशी योजना तयार करण्यात आली आहे. पुढील 20 वर्षांसाठी एमएमआर प्रादेशिक योजना आणि एमएमआर वाहतूक योजना तयार केली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने एमएमआरडीए ला 60 हजार कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग (Samruddhi Corridor) या गेम चेंजर प्रकल्पाचा पहिला टप्पा आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. हा महामार्ग दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC), वेस्टर्न डेडिकेटेड कॉरिडॉर, जेएनपीटीशी (JNPT) जोडला जाईल असेही ते म्हणाले.

नरीमन पॉइंट ते रायगड वीस मिनिटांत

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (MTHL) काम देखील 84% पूर्ण झाले असून नरीमन पॉईंटहून (Nariman Point) वीस मिनिटांत रायगड जिल्ह्यात पोहचू शकणार आहोत. रायगड जिल्ह्यातही ग्रोथ सेंटर (Growth Centre)  बांधण्यात येणार आहे. लॉजिस्टिक पार्क (Logistic Park), टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here