…. अखेर तीन-साडेतीन दिवसाचे प्रेम प्रकरण संपुष्टात आले. अजित पवार यांनी तांत्रिक की अन्य कारण सांगून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आघाडीसोबत सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली आणि राजीनामा दिला. जिच्या भरवशावर संसार थाटण्याचे स्वप्न फडणवीस यांनी बघितले होते, तीच नकार देऊन निघून गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांनाही राजीनामा देण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही. भाजपचे नेते म्हणतात तसे हे भाजपचे राष्ट्रवाडीबद्दल असलेले एकतर्फी प्रेम होते आणि आता ते तुटले आहे. याला जबाबदार कोण याचे चिंतन कदाचित केले जाईल, पण अजित पवार यांनी अचानक माघार का घेतली? माजी राष्ट्रपती यांनी यात किती महत्वाची भूमिका बजावली हे समजून घेऊ. त्याआधी एक फ्लॅशबॅक.
ही घटना आहे दिल्लीतील…. जेव्हा शरद पवार हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी खुर्चीवरून पडले होते आणि त्यांच्या मांडीचे हाड मोडले होते. सुप्रिया सुळे सोबत होत्या. त्यांना टेन्शन आले असावे आणि अगदी safe मार्ग म्हणून त्यांनी पवारांना मुंबईत हलविण्याचा निर्णय घेतला. वेळ नेमकी सांगता येणार नाही, पण ही घटना रात्री केव्हातरी घडली होती. शरद पवारांना रातोरात मुंबईत हलविण्यात आले. अशा वेळी सुप्रिया यांना धीर देणारा आणि खंबीरपणे पाठी उभा राहणाऱ्या अजितदादाची गरज होती. दादा अहमदनगर जिल्ह्यात जनखेड तालुक्यात कुठल्या तरी खेड्यात होते. मोबाईल लागत नव्हता. PA जवळ नव्हता. कसे तरी कुठल्या कार्यकर्त्याला संपर्क साधण्यात यश आले आणि पहाटे 2 वाजता अजित पवार यांच्यापर्यंत घटनेची माहिती पोचविण्यात आली. अजित पवार तसेच उठले आणि रात्री 2 वाजता निघून पहाटे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पुढचे तीन दिवस दादा पवार यांच्यासॊबत हॉस्पिटलमध्ये बसून होते, घरी गेले नाहीत. सुप्रिया दिसली की तिच्यावर रागवायचे की तू घरी जा, आराम कर, मी आहे इथे.
अजित पवार- शरद पवार यांच्यात वाद आहेत, दादा आणि सुप्रिया यांच्यात जमत नाही, तुझ्यामुळे साहेब ईडी मध्ये बदनाम होत आहेत, अशा शब्दांत सुप्रिया चिडल्या म्हणून दादाने तडकाफडकी राजीनामा दिला, हे सगळे प्रवाद आहेत. खरे तर आम्हीच पत्रकारांनी केलेल्या ‘मन की बात’ आहेत. दादांचा पवार यांच्यावर खरोखरच लोभ आहे. दादाला जे ओळखतात त्यांना माहीत आहे की दादांच्या मनात एक आणि ओठात एक असे नसते. ईडी प्रकरणात दादाने दिलेला राजीनामा हे नाट्य नव्हते तर पवार यांच्यावरील प्रेमापोटी उचललेले पाऊल होते.
मग असे काय घडले की दादांनी (पत्रकारांच्या भाषेत) शरद पवार यांच्या पाठीत ‘खंजीर’ का खुपसला असावा? असे काय घडले असावे?
वर नमूद केले त्याप्रमाणे अजित पवारांचा रोखठोक आणि दिलेल्या शब्दाशी प्रामाणिक असलेला स्वभाव भाजपमधील राज्यातील नेत्यांनाही माहीत आहे. म्हणूनच (भाजमधील नेत्यांनी दिलेल्या माहितीच्या अधीन राहून) जेव्हा दादा म्हणाले की ते 25 ते 30 आमदार सोबत आणू शकतात, तेव्हा फडणवीस यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून एक रिस्क घेतली. फडणवीस म्हणाले त्याप्रमाणे निर्णय राज्यात होत असतात आणि त्याची माहिती केंद्रीय नेतृत्वाला दिली जाते.
याचा अर्थ फडणवीस-पवार सरकार स्थापन करण्याचा निर्णय संपूर्णपणे फडणवीस याचाच असावा. पण, शरद पवार यांची खेळी यशस्वी झाली आणि एकाही फुटीर आमदाराला अजित दादा सोबत जाण्याची हिम्मत झाली नसावी. आपला प्रयत्न फसला आहे, हे लक्षात आल्याने दादाने राजीनामा दिला असावा.
याला दुसरी एक बाजू अशीही आहे की (पुन्हा सूत्र) अजित पवार यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा नव्हती. तसेच दादाचे म्हणणे होते की ज्या पृथ्वीराज चव्हाण यांनी 20011 ते 2014 या कार्यकाळात राष्ट्रवादी ला त्रास दिला, त्या चव्हाण याच्यासोबत काम करण्याची इच्छा नव्हती. त्यांनी तसे फडणवीस यांना बोलून दाखवल्याचे म्हटले जाते.
अजित पवार यांचे राजकीय भविष्य काय हे येणारा काळ ठरवेल, पण भाजपमधील राज्यातील नेते केंदीय नेतृवाबाबत काहीसे नाराज आहेत. मोदी असो की पूर्वीचे अटलबिहारी वाजपेयी, यांना शरद पवार यांच्याबद्दल अनावश्यक प्रेम वाटते आणि राज्यात आले की पवारांची स्तुती करताना थकत नाहीत, असा भाजपच्या राज्यातील नेत्यांचा राग आहे. वाजपेयी यांनी पवारांना Disaster Management चे मंत्री समकक्ष पद दिले होते. पण, वाजपेयी सरकार एका मताने पडण्यास पवार कारणीभूत होते, याची आठवण भाजपचे स्थानिक नेते करून देतात.
हे नेते दावा करतात की पवार कधीही भाजपचा फायदा होइल असे वागत नाहीत किंवा तसा निर्णय घेत नाहीत. भूतकाळात त्यांनी असे काही केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाहीत. म्हणूनच हे भाजपचे एकतर्फी प्रेम होते आणि ते आता तुटले आहे.