२१ मार्च रोजी पालिकेने दिली होती नोटीस

@maharashtracity

मुंबई: भाजपचे युवा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या इमारतीमध्ये बुधवारी दुपारी बारा वाजता महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे पथक धडकले. या पथकाने लागलीच इमारतीतील मोहित कंबोज यांच्या राहत्या घरांची झाडाझडती घेतली. तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेऊन पाहणी करून आणि कागदपत्रांची तपासणी करून पालिकेचे पथक पुन्हा पालिका कार्यालयाकडे रवाना झाले.

मोहित कंबोज हे सांताक्रूझ ( पश्चिम) एस. व्ही. रोड येथील १४ मजली इमारतीमध्ये राहतात. या इमारतीमधील चार मजले ते व त्यांचे कुटुंबीय वापरत असल्याचे समजते. पालिकेच्या पथकाने कंबोज यांच्या घरातील बांधकामाची पाहणी केली. तसेच, या इमारतीचा प्लान, आराखडा वगैरे आदींबाबतची कागदपत्रे तपासली. पालिकेच्या पथकाकडून या पाहणीचा अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर कदाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या बंगल्याबाबत घडलेल्या घटना प्रकारानुसार कंबोज यांच्या घरात अनधिकृत बांधकाम (illegal construction) आढळून आल्यास त्यांना त्यांच्या घरातील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी सांगण्यात येईल. त्यासाठी मुदतही दिली जाण्याची शक्यता आहे.

त्यानंतरही कंबोज यांनी अनधिकृत बांधकाम न हटविल्यास त्यावरील कारवाईबाबत पालिका प्रशासन योग्य तो निर्णय घेईल. मात्र, अनधिकृत बांधकाम नेमके कुठे झाले आहे की नाही, याबाबत पालिकेकडून आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती देण्याबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्या एच / पश्चिम विभाग खार (प.) विभाग कार्यालयातर्फे नोडल अधिकारी यांनी मोहित कंबोज यांच्या सोसायटीला १८८८ च्या कायद्याने कलम ४८८ नुसार नोटीस बजावली आहे. त्यांच्या सोसायटीत व घरात अनधिकृत बांधकाम झाल्याचा पालिकेचा संशय आहे.

सूडबुद्धीने कारवाई -: मोहित कंबोज

पालिकेच्या कारवाईनंतर मोहित कंबोज यांनी, पालिका सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप केला आहे. मात्र ‘तुम्ही काहीही करा, मी झुकणार नाही’, अशी भूमिकाही त्यांनी सुरुवातीलाच घेतली आहे. प्रकरण वाढले तर ते पालिकेची कारवाई रोखण्यासाठी राणेंप्रमाणेच न्यायालयात धाव घेऊ शकतात. कदाचित त्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here