पालिकेने बेकायदेशीर बांधकामाबाबत राणा दाम्पत्याला बजावली नोटीस

राणा दाम्पत्य घरी नसल्याने दुसऱ्यांदा पालिका पथक माघारी

@maharashtracity

मुंबई: राणा दाम्पत्य घरी नसल्याने बुधवारप्रमाणेच राणा यांच्या घरी पाहणीला गेलेलेल्या पालिकेच्या पथकाला गुरुवारी दुसऱ्यांदा अवघ्या पाच मिनिटात रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यात घुसून हनुमान चालीसा पठण करण्याचा धमकीवजा इशारा देणारे खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) व आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना जामीन मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र त्यांच्या खार येथील घरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप करीत पालिकेने राणा दाम्पत्याला नोटीस बजावल्याने त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली.

राणा यांच्या घरी धडकलेल्या पालिकेच्या पथकाकडे पत्रकारांनी विचारणा केली असता, आज राणा यांना पालिकेने कोणतीही नवीन नोटीस वैगरे काही दिलेली नाही. आज आम्ही फक्त पाहणी करायला आलो होतो. पण राणा यांच्या घरी कोणीही नसल्याने आम्ही परत जात आहोत. राणा यांच्या घरातील बांधकामाची पाहणी करायला आम्ही कधी यावे, याबाबतची माहिती राणा हे आम्हाला पत्राद्वारे कळवतील. त्यानंतर आम्ही परत त्यांच्या घरी पाहणी करायला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवारी दुपारी १२.५० वाजता राणा यांच्या घरी बेकायदेशीर बांधकामाची पाहणी करायला आलेल्या पालिकेच्या पथकाला राणा दाम्पत्य घरी नसल्याने अवघ्या पाच मिनिटांने म्हणजे दुपारी १२.५५ वाजता परतावे लागले.

हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्यासाठी मातोश्रीमध्ये घुसण्याबाबत इशारवजा धमकी देणारे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेणारे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना तुरुंगवास झाला.

बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र काही प्रक्रिया अपुरी राहिल्याने बुधवारी व आज गुरुवारी दुपारपर्यन्त जेव्हा पालिकेच्या पथकाने राणा यांच्या घरी पाहणीसाठी भेट दिली त्यावेळेपर्यन्त तरी राणा दाम्पत्य घरी पोहचू शकले नव्हते. त्यामुळे राणा यांच्या घरी दुसऱ्यांदा भेट देणाऱ्या पालिकेच्या पथकाला रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. त्यामुळे एकप्रकारे राणा दाम्पत्याला पालिकेच्या पथकाच्या कारवाईपासून दिलासा तेवढाच मिळाला, असे म्हणता येईल.

खार (पश्चिम) १४ व्या रस्त्यावर ‘लाव्ही’ इमारतीत राणा दाम्पत्य यांचे घर आहे. या इमारतीत व काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरीक्त अधिक बांधकाम करण्यात आले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिका नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरुन मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here