मुंबई: भारतीय जनता पार्टीने अंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात पक्षाला स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवल्यास 160 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अहवाल प्राप्त झाला आहे. तर दुसरीकडे भाजपा-शिवसेना युतीचे जागा वाटप सूत्र निश्चित झाले आहे. त्यानुसार सेनेला जास्तीत जास्त 113 ते 117 तर भाजपला जास्तीत जास्त 170 जागा मिळतील. हे सूत्र सेनेला मान्य होणार नाही आणि ऐनवेळी युती तुटेल आणि दोन्ही मित्र पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील, असाच अंदाज राजकीय निरीक्षकाकडून आजपर्यंत लावला जात होता. पण, ताज्या माहितीनुसार युती होईलच, पण शिवसेनेला 70 पेक्षा जास्त जागा जिंकू द्यायच्या नाहीत, अशी रणनीती भाजपच्या चणक्यांनी आखली असल्याची माहिती The News 21 च्या हाती आलो आहे.
काय आहे ही रणनीती आणि त्यामागचे कारण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच लेखकाशी नागपुरात बोलताना युतीचे सूत्र उघड केले होते. भाजपचे विद्यमान 122 तर सेनेचे 63 आमदार आहेत. यात संख्येत काहीही बदल होणार नाही. फार तर काही जागेची अदलाबदल होऊ शकेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. 288 मधून दोन्ही पक्षाच्या या 185 जागा वगळून राहिलेल्या 103 जागेसाठी सूत्र ठरवण्यात आले आहे. त्यानुसार घटक पक्षाला देऊन ज्या जागा शिल्लक राहतील, त्या निम्म्या-निम्म्या वाटून घेऊ, असे फडणावीस म्हणाले.
महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती मोर्चा, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम आणि रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष हे भाजपचे घटक पक्ष आहेत. शिवसेनेचा विरोध मावळला तर नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन होऊ शकेल. यापैकी, दौंड मतदारसंघातून निवडून आलेले राहुल कुल हे जानकर यांच्या पक्षाचे एकमेव आमदार आहेत. त्यांच्या पत्नी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बारामती मतदारसंघात उमेदवार होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पराभूत झाल्या.
भरती लव्हेकर या मेटे समर्थक असल्या तरी 2014 मध्ये वर्सोवा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. खोत यांच्या पक्षाचा आणि आठवले यांच्या पक्षाचा एकही विधानसभा सदस्य नाही.
भाजपच्या सूत्रांच्या अनुसार, या घटक पक्षांना भाजप कोट्यातून एकूण जास्तीत जास्त तीन जागा सोडल्या जातील. कुल हे जानकर यांच्या पक्षाकडून तर लव्हेकर या भाजपच्या उमेदवार असतील. असे झाल्यास 100 जागा शिल्लक राहतील आणि त्या प्रत्येकी 50 याप्रमाणे भाजप आणि सेनेत वाटप झाल्या तर भाजप 122 अधिक 50 म्हणजे एकूण 172 जागा लढवता येतील. तर शिवसेना 63 अधिक 50 म्हणजे एकूण 113 जागा लढू शकतील. अंकशास्त्रावर विश्वास असणारे दोन्ही पक्ष कदाचित 171:117 हे सूत्र मान्य करू शकतील.
दरम्यान, भाजपच्या सूत्रांच्या दाव्यावर विश्वास ठेवला तर भाजपच्या चणक्यांनी अशी रणनीती आखली आहे की युती तर करायची पण शिवसेनेच्या 70 पेक्षा जास्त जागा निवडून येणार नाहीत, याची काळजी घ्यायची.
“कोणताही पक्ष जेवढ्या जागा लढत आहे, तेवढ्या 100 टक्के जागा जिंकू शकत नाही. आम्ही जर 177 जागा लढणार असू तर आमच्या सर्वेक्षणाप्रमाणे किमान 160 जागा जिकू. त्याचवेळी 63 आमदार असलेली सेना 117 जागा जिकून 80 ते 90 जागा जिकणार असेल तर ते भाजपला अडचणीचे ठरू शकेल,” भाजपच्या सूत्राने सांगितले.
भाजपा इतक्या जास्त जागा जिंकणार असेल तर उत्तम, पण 130-140 च्या दरम्यान जागा जिकल्या तर भाजपला बाजूला सारून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तिघेही एकत्र येऊन भाजपला बाजूला सारून सरकार बनवू शकतील, अशी भाजपच्या चणक्यांना भीती वाटते. दोन्ही काँग्रेस मिळून 50-60 जागा जिंकल्या आणि सेनेच्या 90 जागा आल्या तर असे संमिश्र सरकार बनू शकेल. यापूर्वीही अजित पवार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपातून बाहेर पडा, एकत्र सरकार बनवू असे खुले आमंत्रण दिले होतेच.
हाच धागा पकडून भाजपचे चाणक्य युती करायला तयार झालेत पण सेना 70 पेक्षा जास्त जागा जिकणार नाहीत याची व्यूहरचना आखत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. – विवेक भावसार