सत्ताधारी फरार – आशिष शेलार यांचा आरोप

नालेसफाई कामात सत्ताधारी, कंत्राटदार यांचे संगनमत

नालेसफाई कंत्राटकामात खिसे भरण्यासाठी ३० कोटींची वाढ

नालेसफाईच्या कामांवर भाजप टीमचा वॉच

@maharashtracity

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या (nullah cleaning in Mumbai) कामांना उशीर होत असल्याबाबत भाजपने (BJP) अगोदर आवाज उठवला. त्यानंतर पालिका प्रशासन व मुख्यमंत्री यांना जाग आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पालिका व सर्व प्राधिकरणांची बैठक घेतली. मात्र नालेसफाईची जबाबदारी झिडकारून पालिकेतील सत्ताधारी फरार झाले आहेत, अशी खोचक टीका भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी नालेसफाई कामांच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

एवढेच नव्हे तर नालेसफाईच्या कंत्राटकामात सत्ताधारी व कंत्राटदार (contractor) यांच्याकडून संगनमताने खिसे भरण्यासाठी ३० कोटींची वाढ करण्यात आली, असा गंभीर आरोपही आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. नालेसफाईच्या कामांचे प्रस्ताव आपले पितळ उघडे पडू नये यासाठी स्थायी समितीच्या (Standing Committee) बैठकीत मंजूर न करता ते प्रशासनाने मंजूर करण्यासाठी राखून ठेवले, असे आमदार शेलार यांनी सांगितले.

मुंबईत सध्या नालेसफाईची कामे सुरू आहेत. या नालेसफाई कामांची भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगर भागात गुरुवारी पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे पालिकेतील माजी नगरसेवक विनोद मिश्रा, माजी गटनेते प्रभाकर शिंदे, अभिजित सामंत, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, पंकज यादव, माजी नगरसेविका उज्वला मोडक, हेतल गाला, स्वप्ना म्हात्रे, अलका केरकर, एच / पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक सातपुते आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी, भाजपतर्फे साऊथ एव्हेन्यू व नॉर्थ एव्हेन्यू नाला गझदर बंध, एस.एन.डी.टी. नाला व मोगरा नाला या ठिकाणी भेट देऊन नाल्यांची पाहणी करण्यात आली. मात्र फक्त एस.एन.डी.टी. नाला या ठिकाणी पालिका कंत्राटदाराकडून यंत्रणेद्वारे नालेसफाईचे काम सुरू होते. इतर नाल्यात कचरा व गाळाचे ढिगारे असल्याने ते तुंबलेले असल्याचे निदर्शनास आले.

नाल्यातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून चालत वेचला कचरा

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील गझधर बंध नाल्याला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी या नाल्यात गेल्या अनेक दिवसांपासून साचलेल्या व सुकून घट्ट झालेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून चालत जाऊन एका कचरा वेचकाने प्लास्टिक कचरा गोळा केला. हे धक्कादायक वास्तव पाहून आमदार व नेते आशिष शेलार यांनी आश्चर्य व्यक्त केले.

या पाहणी दौऱ्यात मोगरा नालाही कचऱ्याने तुडुंब भरल्याचे निदर्शनास आले. तर एसएनडीटी नाल्यात कचरा, गाळ भरलेला असल्याचे व पालिका यंत्रणेकडून नाल्याची सफाई सुरू असल्याचे दिसून आले.

नालेसफाईच्या कामांना उशीर झालेला आहे. मात्र नालेसफाई जर वेळेत व नीटपणे झाली नाही तर मुंबईकरांच्या माथी नाल्याचे तुंबलेले पाणी दिसेल, असे आमदार शेलार यांनी म्हटले आहे.

नालेसफाईच्या कामांवर भाजप टीमचा वॉच

एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईतील नाले तुंबलेले आढळून आले. सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) नालेसफाई कामांची जबाबदारी झिडकारून फरार झाले आहेत. मात्र नालेसफाईची कामे पारदर्शक व्हायला पाहिजेत. त्यामुळे भाजपचे नगरसेवक, आमदार, खासदार यांची टीम नालेसफाईच्या कामांवर सतत वॉच ठेवणार आहेत, असे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here