उद्धव ठाकरेंनी मागितला राजीनामा
By Santosh More
Twitter: @maharashtracity
मुंबई: बाबरी मशीद पाडण्याची योजना शिवसेना भवनात आखली गेली नाही तर विश्व हिंदू परिषदेने (VHP त्याचे नियोजन केले होते, असे वक्तव्य करणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे आज प्रचंड बरसले. पाटील यांच्या या वक्तव्याशी भारतीय जनता पार्टीने देखील असहमती दर्शवली आणि दादा पाटलांना नंतर खुलासा करावा लागला. बाबरी मशिदीच्या विषयावरून चंद्रकांत पाटील आज भाजपमध्ये एकाकी पडल्याचे दिसून आले.
बाबरी मशीद पाडण्याचे पूर्ण श्रेय विश्व हिंदू परिषदेला देताना चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या शिवसेना आणि हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला. त्यावर संतापलेल्या उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पक्षावर (BJP) प्रचंड तोंड सुख घेतले. पाटील यांनी लालकृष्ण अडवाणींची ती मुलाखत पुन्हा एकदा ऐकावी असा सल्ला देऊन उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यावेळी बाबरी मशीद पाडली गेली, त्याची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नव्हते ,आणि शिवसेनेवर त्याचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की जर बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक असतील तर आम्हाला त्याचा अभिमान आहे. या वक्तव्याची आठवण करून देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की बाबरी मशीद पाडली त्यावेळी असंख्य उंदीर बाहेर पळाले होते, आजचे हे उंदीर त्यातील एक अशी टीका त्यांनी केली.
ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एवढा मोठा अपमान आजपर्यंत कधीही झाला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, पाटील असे म्हणत असताना मिंधे गटाचे 40 आमदार काय करत आहेत? त्यांनी चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, चंद्रकांत पाटील गेल्या वर्षी नागपुरात पत्रकारांशी खाजगीत बोलताना म्हणाले होते की ज्यावेळी मुंबईत दंगली घडल्या, त्यावेळी ते एका चाळीमध्ये राहत असत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना ते मुंबईत होते आणि ज्यावेळी त्यांच्या चाळीवर हल्ला झाला, तेव्हा त्यांना शिवसैनिकांनीच वाचवले होते.
हीच आठवण जागवणारे चंद्रकांत पाटील आज खुलासा करताना पुन्हा एकदा म्हणाले की मला बाळासाहेबांचा अपमान करायचा नाही, परंतु, बाबरी मशीद पाडण्याचं पूर्ण श्रेय हे विश्व हिंदू परिषदेलाच (Vishwa Hindu Parishad) जायला हवे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrshekhar Bawankule) यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली आणि म्हणाले की ते पाटील यांचे वैयक्तिक मत आहे, पक्षाची भूमिका नाही. त्यामुळे पाटील पुन्हा एकदा पक्षामध्ये एकाकी पडल्याचे दिसून आले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आयोध्या दौऱ्यामध्ये गेलेल्या thenews21 च्या टीमने संतोष दुबे या कट्टर शिवसैनिकाची मुलाखत घेतली होती. दुबे हे त्यावेळी बाबरी मशीद पाण्यामध्ये आघाडीवर होते, त्या खटल्यातील मुख्य आरोपी होते आणि अनेक वर्ष ते जेलमध्ये होते thenews21 कडे त्यांनी या सगळ्या आठवणी जागवल्या आहेत. त्याचा व्हिडिओ देखील आपण या ठिकाणी बघू शकता.