मुंबईत शनिवारी महायुतीतर्फे मुंबईकरांचा जनआक्रोश
By Anant Nalavade
Twitter : @NalavadeAnant
मुंबई: उबाठा गटाचा उद्या निघणारा मोर्चा म्हणजे ‘चोर मचाये शोर’ असा प्रकार असून स्वतःची पापे लपवण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे, अशी टीका करत मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईकरांचा खरा आक्रोश महायुती मांडेल असे आज जाहीर केले. उद्या भाजपा मोर्चा, महिला मोर्चा तर्फे शिवसेना, रिपाईच्या पाठींब्यासह उबाठा गटाच्या मोर्चाला चोख प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.
महायुतीतर्फे मुंबईत दोन ठिकाणी जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. युवा मोर्चा आणि महायुतीच्या घटक पक्षांतर्फे नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालय तर महिला मोर्चा आणि महायुती घटक पक्षांतर्फे दादर स्वामीनारायण मंदिर येथे आक्रोश आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी वांद्रे येथील पत्रकार परिषदेत दिली.
उद्धव ठाकरे यांचे काम बगलबच्चांना मालामाल करण्याचे
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले की, उबाठाने २५ वर्षांत मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घातला आहे. अक्षरशः लूट केली आहे. तीन लाख कोटींचा हिशोब तुम्ही द्या. कोविड काळात १२ हजार कोटींचा घोटाळा झाला. बॉडी बॅग, फॉल्टी ऑक्सिजन प्लांट, जंबो कोविड सेंटर, पीपीई कीट, सॅनिटायझर, औषधे बेडशीट कव्हर यात भ्रष्टाचार करून आपल्या जवळच्या लोकांना, बगलबच्चांना मालामाल करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. त्याची चौकशी तर चालू आहेच, पण आम्ही मुंबईकरांतर्फे हिशोब मागत आहोत. एसआयटीने या प्रकरणाची आतापर्यंत चौकशी का केली नाही याचा जाब विचारण्यात येईल.
‘चोर मचाये शोर’ असा उबाठा गटाचा मोर्चा आहे. स्वतः केलेला भ्रष्टाचार उघडा पडायला लागला आहे. जवळच्या लोकांची चौकशी होत आहे. यावर पांघरून घालण्यासाठी त्यांचा मोर्चा आहे. त्यावर प्रश्न विचारण्याचे काम मुंबईकरांच्यावतीने भारतीय जनता पार्टी करणार आहे. यात शिवसेना, रिपाई यांचाही सहभाग आहे. ही महायुती मजबूतपणे मुंबईकरांसाठी प्रश्न विचारणार आहे. उबाठाच्या या आंदोलनाला अजून तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिलेला नाही. त्यांनी उबाठाला झिडकारलेले दिसते. उबाठाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना अजून तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिलेले नाही. यातच त्यांची बाजू लंगडी आहे, जी काही बाजू उरली आहे ती, आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व आणि त्यांच्या जवळच्या बगलबच्चांना अजून उघडे पडण्यापासून वाचवण्यासाठी आहे. आमचे आंदोलन मुंबईकरांच्या खिशातील एक एक रुपयांचा हिशोब मागणारे आंदोलन आहे असे आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.
‘लागली मिर्ची निघाला मोर्चा’
मुंबईकरांचे आदित्य ठाकरे यांच्या मोर्चाकडे लक्षच नाही. मुंबईकरांचे लक्ष चांगल्या बनणाऱ्या रस्त्याकडे आहे. ईडी आणि एसआयटीपासून लक्ष भटकवण्यासाठी त्यांचा मोर्चा आहे. आदित्य ठाकरे खोटं राजकारण करत आहेत. याचा सबळ पुरावा म्हणजे त्यांच्या राज्यव्यापी परिषदेत मोर्चाची घोषणा झाली नाही. त्यांच्या गटाचा वर्धापन दिन त्यामध्ये सुद्धा मोर्चाचे नाव निघाले नाही. ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात एसआयटी घोषित केली त्यावेळी मोर्चा घोषीत केला. म्हणूनच ‘लागली मिर्ची निघाला मोर्चा’… त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोर्चाची घोषणा झाली. यांना मुंबईकरांशी काहीही घेणे देणे नाही. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” एवढ्या स्वार्थी हेतूने या मोर्चाचे आयोजन आहे. आमचे आंदोलन मुंबईकरांसाठी आहे असेही आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.
२५ वर्षातील उबाठाची पापं मुंबईकरांच्या माथी
मुंबईकरांना पावसाळ्यातील त्रासापासून वाचवण्यासाठी मुंबई महापालिका उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर करावी लागेल. गेल्या वर्षभरात या समस्या झाल्या आहेत असे नरेटीव सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गेल्या पंचवीस वर्षात समुद्रसपाटीपासून डिस्चार्ज सेंटर, आऊट फॉल उंचीवर का नाही बांधले? समुद्राचे जमिनीकडे येणारे पाणी का थांबवले नाही. ब्रिमस्टोवड अहवालानुसार पावसाचे पाणी समुद्राकडे घेऊन जाणारे नाले गेल्या २५ वर्षात परिपूर्ण का झाले नाही? मिठी नदीच्या साफसफाईवर गेल्या बारा वर्षात हजारो करोडो रुपये खर्च होऊन त्याचे काम पूर्ण का झाले नाही? रस्ते चांगले व्हावे यासाठी चांगले काम करणारे कंत्राटदार, चांगले तंत्रज्ञान यासाठी काहीही झाले नाही. ही गेल्या २५ वर्षातील पापं मुंबईकरांच्या माथी मारली जात आहेत. शिंदे- फडणवीस सरकारने नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर नवीन रस्ते बांधण्यासाठी सुरुवात केली. वेस्ट वॉटर ट्रीटमेंटसंबंधी सहा कामे सुरू झाली. मुंबईकरांना जो त्रास होतोय त्यामध्ये भ्रष्ट व्यवस्था, भ्रष्ट कंत्राटदार, भ्रष्ट नेतृत्व जबाबदार आहे अशी टीका आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.