मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार
Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेच्या कामांची कॅगने केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५ कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यामुळे या मागचा सुत्रधार कोण हे उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व कामांची फौजदारी कलमांतर्गत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या अहवालातून मुंबई महापालिकेतील कट, कमिशन आणि कसाई असा कारभार समोर आला आहे, अशी टीका ही आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबई भाजपा कार्यालयात आज आमदार ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन कॅगच्या अहवालातून समोर आलेली निरिक्षणे मांडून या प्रकरणी चौकशीची मागणी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र ही लिहिले आहे.
यावेळी आमदार ॲड आशिष शेलार पुढे म्हणाले की, पुर्वी एक सिनेमा आला होता “पाप की कमाई”, पण आता मुंबई महापालिकेतील ९ विभागातील ७६ कामांमधील १२ हजार कोटींच्या घोटाळयावर सीएजीने जे विश्लेषण केले आहे त्यावरुन स्पष्ट दिसते आहे की, मुंबई शहरात काय लुटमार चालली आहे. त्याचे वर्णन करायचे झाले तर ज्या मुंबई महापालिकेचे नेतृत्व उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करीत होते त्याचे वर्णन करायचे तर “कट, कमिशन आणि कसाई असे करता येईल.
शेलार म्हणाले, कट, कमिशन आणि कसाईचा गोरख धंदा या दोघांच्या उघड्या डोळयासमोर सुरू होता ते आता उघड झाले आहे. मुंबईत सर्रासपणे मुंबईकरायचे खिसे कापले गेले, निर्दयीपणे खिसे कापले गेले, एखादा कसाई ज्या पध्दतीने निर्दयी वागतो तसे हे मुंबईकरांसोबत वागले. मुंबईकरांचे जिव गेले. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकला. या संपुर्ण प्रकरणचा “कट, कमिशन आणि कसाई” असा एक चित्रपट बनावा अशा या सगळया घटना आहेत.
कॅगचा अहवाल हा केवळ २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ आक्टोबर २०२२ या कालावधीतील असून यामध्ये कोविडची कामे नाहीत. केवळ ७६ कामांमध्ये ८४८५ कोटींचा हा घोटाळा उघड झाला असून, या प्रकरणी फौजदारी दंड संहिता अंतगर्त एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केल्याचे पत्र आमदार ॲड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. कारण यात बरेच हात गुंतलेले आहेत. असा त्यांचा आरोप आहे.
ते म्हणाले की, या संपुर्ण प्रकरणाची कहानी फार मजेशीर आहे, रस्ते कसे बनवावे याचे मुंबई महापालिकेमध्ये एक येलो बुक आहे किंवा बांधकामाबाबत राष्ट्रीय बांधकाम कोड आहे तसेच टेंडरच्या बाबतीत काय काय करता येऊ शकतं याचं पुस्तक आदित्य ठाकरे यांनी लिहावे, एवढे घोटाळे आहेत.
टेंडरविना काम आहे, टेंडरपेक्षा जास्त काम दिलंय, टेंडर पडताळणी विना काम दिले आहे, टेंडर अटी शर्ती भंग आहे, टेंडरमध्ये फेरफार आहे, टेंडर एकत्रीकरण म्हणजे अमाल कमिशन पण आहे आणि टेंडर अपात्र असलेल्यांना पण दिले आहे. म्हणजे या टेंडरची नवी “सप्तपदी” आदित्य ठाकरे यांनी मुंबईला दाखवली आहे. हिंदुस्थानात कुठल्याच सरकारमध्ये झाला नसेल इतका मोठा हा घोटाळा आहे.
काही काम टेंडर विना दिली, काही कामांमध्ये टेंडरपेक्षा जास्त काम दिले, काही कामांमध्ये टेंडर पडताळणी नाही, काही कामांमध्ये अटीशर्तीचे भंग केलाय तोही मान्य करण्यात आला आहे.
सगळ्यात भयंकर म्हणजे सिस्टमिक चेंज म्हणजे टेंडरमध्ये फेरफार करण्यात आली आहे, काही ठिकाणी चार कंपन्या सांगून टेंडर दिले पण ती एकच कंपनी आहे, काहि ठिकाणी तर पात्र नसलेल्यांनाच टेंडर देण्यात आले आहे. हे कंत्राटदार तुमचे जावई आहेत का, असा सवाल करीत हे तर हिमनगाचे टोक आहे. ही काही कामांची चौकशी आहे, याच कालावधीतील सर्व विभागातील कामांची चौकशी झालेली नाही. सर्व कामांचीही पडताळणी कॅगने केलेली नाही.
त्यामुळे याच कालावधीतील सर्व कामे, सर्व विभागातील कामे आणि सर्व ठेके ही जी लुटमारीची सप्तपदी आदित्य ठाकरेंनी दिलेय त्यांची चौकशी करा, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
पालिकेने दोन भागांमध्ये 20 कामे, 214 कोटींची टेंडर न काढताच दिली. 4755 कोटीची कामे 64 कामे कंत्राटरांना दिली पण त्याचा करारच करण्यात आला नाही.
त्यानंतर 3355 कोटीची तीन वेगवेगळ्या विभागाची 13 काम ही टेंडर मध्ये दिली आहेत त्याची पडताळणी करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिटची व्यवस्थाच नाही. पारदर्शकतेचा अभाव, निष्काळजीपणा, ढिसाळ नियोजन आणि निधीचा गैरवापर या बाबी यातून उघड झाल्या आहेत. म्हणून उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे सरकार हे कसाई सारखे मुंबईकरांशी वागले. त्यांची कार्यपध्दती ही कट, कमिशन, कसाई सारखी आहे असे आमचे म्हणणे आहे, असा आरोप आमदार ॲड आशिष शेलार यांनी लगावला.
दहीसर मधील 32,394.90 चौरस मीटर जागा बगीचा/ खेळाचे मैदान/ मॅटर्निटी होम यासाठी 1993 च्या डी.पी. प्रमाणे राखीव होती. डिसेंबर 2011 मध्ये अधिग्रहणाचा BMC चा ठराव झाला त्याचे अंतिम भूसंपादन मूल्यांकन : 349.14 कोटी ठरवण्यात आले हे करताना सूत्र वापरुन 2011 पेक्षा 716 % अधिक म्हणजे 206.16. कोटी रुपये अधिकचे मुल्यांकन करण्यात आले. ज्या जागेची किंमत 130 कोटी होती ती 349 कोटी केली. तेवढयावरच थांबले नाहीत, विकासकाला निर्माण करता यावे म्हणून त्या जागेवर अतिक्रमण होते ते काढण्यासाठी पालिकेने 77.80 कोटी खर्च केले. म्हणजे 130 कोटीच्या जागेवर 420 कोटी रुपये खर्च केले.
मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी त्यावेळी 2007 च्या सुमारास सॅप प्रणालीतील घोटाळा उघड केला होता. तत्कालीन पालिका आयुक्तांचे दालन व महापौर दालनसमोर आंदोलन केले होते व चौकशीची मागणी केली होती त्याची आज आठवण करुन देत आमदार ॲड आशिष शेलार यांनी यातील सत्य आता कॅग अहवालात कसे उघड झाले हेही पत्रकारांसमोर मांडले.
सॅप प्रणालीच्या नावाने मुंबई महापालिकेला या कसायांनी लुटले, असा आरोपही ॲड शेलार यांनी केला. या सॅप प्रणालीमध्ये एकुण सात मोडयूल होते पैकी दोन मोडयूल आतापर्यंत म्हणजे 2006 ते 2023 या 16 वर्षात कार्यान्वयीत झाली. पाच मोडयूल कार्यान्वयीत झाली नाही. मात्र न केलेल्या कामाचे पैसे या कंपन्यांना देण्यात आल्याचे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. आम्ही त्याचवेळी हे सांगत होतो आंदोलन करीत होतो, त्यावेळी उध्दव ठाकरे म्हणाले होते की, सॅप सॅप म्हणून भूई धोपटत आहेत. वारंवार केवळ शब्दछळ करुन विनोद करणाऱ्यांनी त्यावेळीही असाच विनोद केला तरी त्यातील सत्य आता उघड झाले आहे. या प्रणालीमध्ये टेंडर फेरफार होतात असेही आता उघड झाले आहे हे अत्यंत गंभीर आहे.
डॉ. ई मोजेस मार्ग, केशवराव खाडे मार्ग, या आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील या कामांमध्ये कंत्राटरांनी निविदा अटींचा भंग केला तरी कंत्राटदाराला मदत करण्यात आली. 27 कोटींचा लाभ कंत्राटदाराला झाला. हे कंत्राटदार तुमचे जावई लागतात का, असा सवालही आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला. परेल टीटी उड्डाण पुल, मिठी नदी अशा वरळी, वांद्रे मातोश्री जवळची अनेक कामे निविदा न काढता, नियम न पाळता देण्यात आली. म्हणून या सगळयाची एसआयटी चौकशी व्हावी, सूत्रधार कोण, कसाई कोण हे मुंबईकरांसमोर उघड व्हावे, असे आमदार शेलार यांनी यावेळी सांगितले.