Twitter : @maharashtracity
मुंबई
सभागृहात अविश्वास ठराव दिल्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांना पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, असे प्रतिपादन शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार अनिल परब यांनी आज विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना केले.
अनिल परब म्हणाले, काही दिवसांपूर्वी गोऱ्हे यांनी स्वत:हून पक्ष सदस्यत्व सोडले आहे. दहाव्या परिशिष्टातील कायद्याच्या २ ‘अ’ मध्ये अपात्रतेची तरतूद आहे. त्याअंतर्गत आम्ही त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. तरीही विधान परिषद उपसभापती म्हणून डॉ. नीलम गोर्हे काम पहात आहेत.
ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेचा निर्णय काय झाला आहे हे सर्वांना माहीत आहे. सध्याच्या परिस्थितीत सभापतीच नाही आणि उपसभापतींवरच अविश्वासाचा ठराव आहे. यासाठीच आम्ही त्यांना पदावरून हटवण्याचीही नोटीस दिली. सर्वोच्च न्यायालयाने नबाम राबिया प्रकरणात निकालाद्वारे स्पष्ट केलेले आहे. सभापती- उपसभापतींवर अविश्वास दाखवला जातो त्या वेळी त्या सदस्याला आसनावर बसण्याचा कायदेशीर वा नैतिक अधिकार नाही. जोपर्यंत अपात्रता याचिकेचा निर्णय लागत नाही, पदावरून दूर करण्याच्या नोटीसविषयी निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांनी सभापती आसनावर बसू नये, अशी आम्ही भूमिका घेतली. मात्र आमची भूमिकाच न मांडू दिल्यामुळे सभात्याग केला.