ऋतुजा लटके यांच्यासह ७ उमेदवारच रिंगणात
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती लपवली आहे. त्यांनी २०१७ च्या पालिका निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचे उघड झाले व त्यांना निवडणूक आयोगाने ६ वर्षे निवडणूक लढवायला मनाई केली. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले. अशा परिस्थितीत आज या निवडणुकीला अनपेक्षित वळण लागले. भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी व आणखीन सहा उमेदवार अशा ७ उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ऋतुजा लटके यांच्यासह एकूण ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, मनसे नेते राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी विनंती केल्यावरून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याबरोबर आणखीन सहा जणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १४ पैकी ७ उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहे. दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ७ उमेदवारांमध्ये अंतिम लढत होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. यानुसार सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत १४ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ७ उमेदवारांपैकी एका उमेदवारास निवडून आणण्यासाठी आपले बहुमूल्य मत देऊन नागरिकांना आपला मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे, अशी माहिती ‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे
१. श्री.निकोलस अल्मेडा (अपक्ष)
२. श्री.मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)
३. श्री. साकिब जफर ईमाम मल्लिक (अपक्ष)
४. श्री.राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)
५. श्री.चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)
६. श्री. पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)
७. श्री.चंदन चतुर्वेदी (अपक्ष)
मतदान प्रक्रियेसाठीच्या अंतिम यादीतील उमेदवारांची नावे -:
१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. श्री. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)
३. श्री. मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)
५. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६. श्री. मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. श्री. राजेश त्रिपाठी (अपक्ष)