By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीला आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत असून पक्षाच्या विकासासाठी आम्ही काम करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.

एकाच नेत्याला विरोधी पक्षनेता आणि प्रतोद नेमता येत नाही, असे सांगत अजित पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेते आणि प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. पण ते काम हे विधानसभा अध्यक्षांचे आहे. ज्या विरोधी पक्षाची सर्वात जास्त संख्या असते, त्या पक्षाच्या नेत्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात येते. आता जे काही करण्यात आले ते आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केले जात आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना अजित पवार महाले की, राज्यातील नवीन महायुतीचे सरकार चांगल्या पद्धतीने चालवून दाखवतो. ते म्हणाले की, “कुणाला हे बंड वाटते तर कुणाला काय, पण कायद्यानुसार गोष्टी वेगळ्या असतात. रात्री 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन काहीही निर्णय घेतले जातात. त्यांना काही अर्थ नाही. पक्षाचे बहुसंख्य आमदार कुणाकडे आहेत, नेते कुणाकडे आहेत, बहुमत कुणाकडे आहे याचा विचार केला पाहिजे.”

राष्ट्रवादी पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आपल्याला असल्याने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांना अपात्र करा, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केल्याची माहिती अजित पवारांनी दिली. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जो विकास सुरू आहे त्याला सहकार्य करणार असक्याचेही अजित पवार म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनिल तटकरे यांनी नियुक्ती करत असल्याचं जाहीर केलं. या आधीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती ही हंगामी होती, त्यांना आता जबाबदारीतून मुक्त करण्यात येत असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करत असल्याचे नवीन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहीर केले. तर अमोल मिटकरी यांची पक्षाचे प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं.

दरम्यान, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here