आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा बुधवारी महाडमध्ये

By मिलिंद माने

@maharashtracity

महाड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद, आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्या बालेकिल्ल्यात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची निष्ठा यात्रा बुधवारी महाडमध्ये दाखल होत असून आदित्य ठाकरे यांच्या भाषणाकडे आणि सभेकडे महाडकरांचे लक्ष लागून राहिले आहे. सायंकाळी चार वाजता ही सभा आयोजित केली असल्याची माहिती शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे यांनी दिली.

शिवसेनेतून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे पक्ष प्रतोद आमदार भरत गोगावले यांचा मतदार संघ आणि बालेकिल्ला ओळखल्या जाणाऱ्या महाडमध्ये (Mahad) आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा घेवून दाखल होत आहेत.

गेले महिनाभर शिवसेनेच्या दोन्ही गटात आरोप – प्रत्यारोपांनी कळस गाठला आहे. यामुळे शिवसैनिकांना प्रेरित करण्यासाठी आदित्य ठाकरे गेले काही दिवस महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले कट्टर शिवसैनिक (Shiv Sainik) म्हणून ओळखले जात होते. शिवसेनच्या माध्यमातून गोगावले तीन वेळा आमदार झाले. मात्र, त्यांना सुरवातीच्या भाजप – शिवसेना युतीमध्ये अणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने गोगावले नाराज होते. यामुळे त्यांनी शिंदे गटाची वाट धरली. यामुळे या निष्ठा सभेला विशेष महत्व असल्याचे स्पष्ट होत आहे.

नुकत्याच झालेल्या सत्तास्थापनेनंतर महाडमध्ये प्रथमच शिवसेनेची सभा होत आहे. शिंदे गटाचे प्रतोद असलेल्या भरत गोगावले यांचा या मंत्रिमंडळात देखील समावेश न झाल्याने आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे देखील शिवसैनिक लक्ष देवून आहेत. महाड, पोलादपूर, माणगाव हे तिन्ही तालुके शिवसेनेचे बालेकिल्ले राहिले आहेत. शिवाय स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या संकल्पनेतून तळागाळात शिवसेना पोहोचली आहे. ग्रामीण भागातील शिवसैनिक कायम स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीशी असल्याचे महाडसह अन्य तालुक्यात देखील दिसून येत आहे. महाडमधील छ.शिवाजी चौक येथे ही सभा होत असून या सभेला महाड, माणगाव, पोलादपूरमधील मूळ शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here