@maharashtracity
पाटणा: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज बुधवारी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे युवानेते तेजस्वी यादव (RJD Leader Tejashwi Yadav) यांची भेट घेतली. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना संविधान आणि लोकशाहीसाठी देशातल्या तरूणांनी संपर्कात राहून, एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं.
आदित्य म्हणाले, आम्ही आजवर नेहमी संपर्कात राहत होतोच, आता भारतातील युवा म्हणून विविध विषयांवर एकत्र काम करू, अशी खात्री आहे. दरम्यान, या भेटीवेळी आदित्य ठाकरे यांनी तेजस्वी यादव यांना छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) मूर्ती भेट दिली.
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Bihar DCM Tejaswi Yadav) यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ये दोस्ती आगे चलती रहेगी. संविधान बचाव आणि लोकशाही (Democracy) वाचवण्यासाठी दोन युवा नेत्यांची ही भेट होती, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य पुढे बोलताना म्हणाले की, ही राजकीय भेट नाही. प्रत्येकवेळी राजकीय भेट म्हणून बघू नका. फक्त तेजस्वी यादव यांच्या कामामुळे ही भेट घेतली आहे असंही त्यांनी सांगितलं. पर्यावरण, विकासात्मक गोष्टींवर चर्चा, औद्योगिक विकास, देशातील युवकांच्या रोजगाराच्या समस्यांबाबतही चर्चा केली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पटना येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Bihar CM Nitish Kumar) यांचीही सदिच्छा भेट घेतली. यावेळी सध्याच्या विविध विषयांवर चर्चा झाली. नितीश कुमार वापरत असलेली इलेक्ट्रिक गाडी, पर्यावरण यावरही चर्चा झाली, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. बाळासाहेब (Balasaheb Thackeray) आणि उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) नितीश कुमार यांचे जुने संबंध आहेत, त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असं आदित्य ठाकरे म्हणाले.