@maharashtracity
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासन
धुळे: धुळे (Dhule) शहरातील अतिशय वर्दळीच्या चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपूल उभारण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी मान्यता दिली आहे.
येथील तरुण उद्योजक जयेश बाफना यांच्या पत्राची गंभीर दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (NHIA) विभागाला तशा सूचना दिल्या असून, तसे पत्र जयेश बाफना यांना प्राप्त झाले आहे.
धुळे शहरातून जाणार्या मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai – Agra National Highway) चाळीसगाव चौफुलीजवळ सदोष उड्डाणपुलाच्या रचनेसंदर्भात जयेश दिनेश बाफना यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले होते. तसेच १४ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या पीजी पोर्टलवर देखील तक्रार करण्यात आली होती.
त्यात म्हटले आहे की, चाळीसगाव चौफुलीवर ज्या ठिकाणी उड्डाणपूल संपतो, त्याच ठिकाणी हायवेचे जंक्शन आहे. रस्ता सुरक्षा धोरणानुसार या ठिकाणी उड्डाण पुलाची आवश्यकता होती. परंतु उड्डाणपुलाची निर्मिती करताना काही महत्त्वपूर्ण बाबी दुर्लक्षित केल्या आहेत. या सदोष रचनेमुळे आतापर्यंत लहान-मोठे हजारो अपघात घडले आहेत. त्यात अनेकांना प्राण गमवावे लागल्याचे जयेश बाफना यांनी पत्रात नमूद केले होते.
या पत्राची दखल घेत नितीन गडकरी यांनी संबंधित यंत्रणेला परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार एनएचएआयने चौकशी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जयेश बाफना यांनी आपल्या पत्रात उपस्थित केलेले मुद्दे वस्तुस्थितीवर आधारित असल्याचा अहवाल एनएचएआयने नितीन गडकरी यांना दिला आहे. सकारात्मक अहवाल प्राप्त होताच मंत्री गडकरी यांनी उड्डाण पुलाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार एनएचएआयने जयेश बाफना यांना पत्र पाठविले असून, चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपूल उभारण्यास (Construction of new flyover at Chalisgaon crossing) प्राथमिक मान्यता दिली आहे. त्यासाठी पुढील कार्यवाही लवकरच करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत, अशी माहिती जयेश बाफना यांनी दिली.
“रेल्वे रुळासाठी उभारलेला उड्डाण पूल चाळीसगाव चौफुलीजवळ संपविला आहे. मुळात हा पूल चौफुलीवरुन करायची आवश्यकता होती. तसे न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मी स्वतः रस्ते अपघाताचा बळी झालो आहे. इतर कोणाचा अपघात होऊ नये यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे उड्डाण पूल आणखी एक किलोमीटरपर्यंत वाढवावा, अशी माझी मागणी आहे. संबंधित विभागाने मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.”
- जयेश बाफना